बारामती : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, बारामतीतही सहा कोरोनाचे रुग्ण सापडले.त्यातच शहरात एका रुग्णाचा झालेला मृत्यू बारामतीकरांना हादरवून गेला. बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राज्यात, देशात चर्चा आहे.मात्र, एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्यावर बारामतीकर धास्तावले.मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईची चक्र वेगानं फिरवली. याच वेळी पवार यांच्या संकल्पनेतुन 'बारामती पॅटर्न' पुढे आला.कुणी म्हणतं, राजस्थानातल्या भिलवाडा पॅटर्नप्रमाणे आज बारामतीत कोरोनाविरुद्धची लढाई सुरु आहे. परंतु खरं सांगायचं तर, भिलवाडा पॅटर्नला मागे टाकून आज शहराची वाटचाल स्वतंत्र बारामती पॅटर्नकडे सुरु आहे. कोरोनाला हरवण्याचा अनोखा बारामती पॅटर्न इतर शहरासाठी पथदर्शी ठरत आहे.आज संपुर्ण बारामती शहर सील करण्यात आले आहे. नागरीकांना हव्या असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू त्यांना एका एसएमसएस वर अगदी घराच्या उंबऱ्यावर मिळत आहेत. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडायचा प्रश्नच नाही. गरजा घरातच पूर्ण होत असल्याने आता बारामतीत शंभर टक्के लॉकडाऊन आहे. ''कोरोना' ला हरवायला 'बारामती' पॅटर्न ची मात्रा लागू पडत असल्याचं सकारात्मक चित्र सध्या दिसत आहे. हा पॅटर्न प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, विक्रेते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या समन्वयातून काम करण्याचं यशस्वी मॉडेल आहे. यामध्ये राज्यशासनाच्या सर्व विभागांबरोबरच बारामती नगरपालिकेचाही महत्वाचा सहभाग आहे. बारामती नगरपालिकेचे नगरसेवक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांचाही यात सहभाग आहे. नागरिकांना आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य, दुध, गॅस सिलेंडर, फळे व भाजीपाला यांची यादी त्यांच्या वॉडार्तील संबंधित लोकांच्या मोबाईल टाकल्यावर काही कालावधीतच अगदी दारात नागरिकांना या वस्तू मिळत आहेत.प्रशासनाकडून एका मोबाईल अॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर यादी टाकल्यावर काही वेळातच नागरिकांना अगदी दारातच वस्तू आणि भाजीचा पुरवठा होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना विविध तक्रारी मांडण्यासाठी सुध्दा स्वतंत्र अॅपची निर्मिती प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. सामान्य नागरीकांसाठी किराणा मालाबरोबरच प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून अत्यंत माफक दरात भाजी,दुधाची उपलब्धता केली आहे.———————————————...अत्यावश्यक सेवेसाठी डिजिटल पास शहरात अत्यावश्यक सेवांसाठी पोलीसांच्याकडून डिजीटल पास देण्यात आले आहेत. पोलिसांसाठी 'कोरोना वॉरिअर', वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 'कोरोना फायटर' आणि स्वयंसेवक-सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी 'कोरोना सोल्जर' आशा तीन प्रकारच्या, तीन वेगवेगळ्या रंगाच्या पासची व्यवस्था करण्यात आली आहे. विनापरवाना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
Corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी ‘भिलवाडा’पेक्षा 'बारामती' पॅटर्न ठरतोय प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 6:43 PM
एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची लागण झाल्यावर बारामतीकर धास्तावले.मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईची चक्र वेगानं फिरवली...
ठळक मुद्दे नागरिकांना घरामध्येच रोखण्यात प्रशासनाला यश ...अत्यावश्यक सेवेसाठी डिजिटल पास