Corona virus : पुणे शहरातील दोन्ही जम्बो कोविड हाॅस्पिटल २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार : सौरभ राव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 12:45 AM2020-08-01T00:45:25+5:302020-08-01T11:10:29+5:30
उपमुख्यमंत्र्यांच्या 'बुस्टर'नंतर जम्बो हॉस्पिटलच्या कामांना वेग..
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर पुण्यातील प्रशासन मिशन मोडमध्ये आले असून, पुण्यातील तब्बल ६२५ बेड्सची पहिली जम्बो फॅसिलिटीज येत्या दहा दिवसांत पिंपरी-चिंचवड येथे प्रत्यक्ष सुरू होईल, असे विभागीय विशेष अधिकार सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर पुण्यातील दोन्ही जम्बो हाॅस्पिटल २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त डाॅ. दिपक म्हैसेकर शुक्रवार (दि.३१) रोजी सेवानिवृत्त होत झाले असून, यापुढे सौरभ राव विभागीय आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. या निमित्त झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषद राव यांनी वरील माहिती दिली.
पुण्यात पुढील पंधरा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्यार असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर काम करुन व सर्वांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुण्यात घेतलेल्या बैठक दिले होते. याबाबत राव यांनी सांगितले पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील दहा दिवसांत ६२६ बेड्स ची सुविधा निर्माण करत आहोत, यात ५२५ ऑक्सिजनेटेड बेड व ६० आयसीयु बेड राहणार आहेत. तर पुण्यातील दोन जम्बो हाॅस्पिटल एक सीओईपी मैदानावर व दुसरे एसएसपीएमएसच्या मैदानावर उभारण्यात येणार आहे. या साठीची वर्क ऑर्डर शनिवार (दि.१) पर्यंत देण्यात येणार असून, २० ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष हाॅस्पिटल सुरू करण्याचे नियोजन असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
---
कोविडसाठी ३ ऑगस्टपर्यंत ससून रुग्णालयात ८७० बेड
पुण्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नवीन जम्बो फॅसिलिटीज तयार करण्या सोबतच अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांतील बेड्स ची संख्या वाढविण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. यात ससून रुग्णालयावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सध्या ससून रुग्णालयात ४४६ बेडस वर कोविड रुग्णांसाठी प्रत्यक्ष वापरत असून, पुढील तीन दिवसांत म्हणजेच ३ ऑगस्ट पर्यंत ससून रुग्णालयात तब्बल ८७० बेड्स केवळ कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेल्या स्टाफ व अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देखील राव यांनी सांगितले.
----
दुकाना संदर्भातील पी-१, पी-२ चा चेंडू शासनाच्या कोर्टात
पुण्यातील सर्वच व्यापारी संघटनांकडून पी-१, पी-२ रद्द करुन सर्व दुकाने सकळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची जोरदार मागणी होत आहे. शासनाच्या अनलाॅक तीन चा टप्पा 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. याबाबत विभागीय विषेश अधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की अनलाॅक संदर्भातील सर्व आदेश राज्य शासनाच्या स्तरावर निघणार आहेत. तसेच पी-१, पी- २संदर्भात देखील शासनच निर्णय घेणार असल्याने पुण्यात सर्व दिवस सर्व दुकाने सुरू ठेवण्या संदर्भात आम्ही काही करू शकत नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.