पुणे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहर लॉकडाऊन आहे. नागरिकांना संचारबंदी आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. एकीकडे नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी प्रशासकीय दृष्टीने काळजी घेण्यात आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकाला जीवनावश्यक वस्तू बरोबर इतर मालाची खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: पॅकिंग केलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासून बघणे, निकृष्ट दर्जाचा किराणा माल खरेदी करावा लागणे, याशिवाय परिस्थितीचा फायदा घेऊन जो कुणी दुकानदार चढ्या दराने वस्तूंची विक्री करत असल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून जागरूक राहावे लागणार आहे. एखाद्या दुकानदाराकडून फसवणूक होत असल्यास काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देताना पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर म्हणाले, कोरोनामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारे दुकाने सुरू आहेत. 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन असल्याने ग्राहक एकदम काही वस्तूंची खरेदी करून ठेवत आहेत. अशावेळी ज्या वस्तू खरेदी केल्या आहेत त्यांची एक्सपायरी डेट त्यांनी तपासण्याची गरज आहे. किराणा मालाचा जो जुना साठा आहे तो ग्राहकांपर्यत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी ग्राहकांनी सावध राहावे. सध्या तक्रार करण्यासाठी त्यांना अडचणी येऊ शकतात. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर ते सबंधित दुकानदाराविरोधात तक्रार करू शकतात. दुकानदाराने सहकार्य करण्याची गरज आहे. अशावेळी त्यांनी आर्थिक फायद्याकडे न पाहता ग्राहकांच्या हिताचा विचार करावा. माणुसकीच्या दृष्टिकोनातून तो व्यवहार कसा होईल याकडे लक्ष द्यावे. याउलट जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा?्या विक्रेत्यांनी नफा कमी करून सेवा द्यायला हवी.
ग्राहकाने काय करावे..?- ग्राहकांनी आपल्याला नेमक्या कुठल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्याची यादी करावी. (उदा.तेल, डाळी, साखर, इतर किराणा माल ) खरेदी शक्यतो एकदाच करण्यावर भर द्यावा. म्हणजे घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही.
- ज्या वस्तूची खरेदी केली आहे त्याचे बिल दुकानदाराकडून घेणे गरजेचे आहे. यामुळे ज्या वस्तुविषयी शंका आहे त्याच्या विरोधात दुकानदाराला जाब विचारता येईल. यामुळे संबंधित दुकानदार किती दराने मालाची विक्री करत आहे हे कळण्यास मदत होईल.
- विशेषत: पॅकिंग केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यावरील मुदत दिनांक तपासून पाहावे. ज्यावेळी न्यायालयाचे कामकाज सुरू होईल त्यावेळी दाद मागता येईल. तसेच शासनाने जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे त्यांना विचारणा करता येईल.