पुणे : कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण शोधून काढणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. लक्षणेविरहित रुग्ण रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर आपोआप बरे होत आहेत. त्यांच्या शरीरात अँटिबॉडी (प्रतिपिंडे) तयार झाल्याने संसर्गाचा सामना करणे शक्य होते. किती लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी रँडम सॅम्पल टेस्टिंग करता येई शकते. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि स्वच्छता या तीन शस्त्रांच्या सहाय्याने आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई लढायची आहे, ही गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार अधोरेखित केली जात आहे. कोरोना जीवघेणा आजार नाही, त्यामुळे 'काळजी करू नका, पण काळजी घ्या' हे सूत्र समाजमनावर बिंबवण्याची आवश्यकता आहे.
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या सिरॉलॉजी चाचण्यांमधून काही निष्कर्ष पुढे आले आहेत. दिल्लीतील सुमारे २४ टक्के नागरिक कोरोनाग्रस्त असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. हे सर्व रुग्ण लक्षणेविरहित असून, ७६ टक्के दिल्लीकरांना कोरोनाचा धोका कायम आहे. त्यात जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्लीची लोकसंख्या सव्वा दोन कोटी तर पुण्याची ४५ लाखांच्या आसपास आहे. याचाच अर्थ पुण्यातही लक्षणेविरहित रुग्णांची संख्या मोठी असू शकते. पुण्यातील चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी प्रत्येक लक्षणेविरहित कोरोनाबाधितापर्यंत पोहोचणे सध्या तरी शक्य नाही. रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. आर्थिक चक्र सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आज ना उद्या लोकांना बाहेर पडावेच लागणार आहे. त्यामुळे स्वतःची आणि इतरांची काळजी घेत कोरोनाची लढाई लढावी लागणार आहे.
संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, 'कोरोनाबाधित रुग्णांना फक्त सर्दी, कणकण किंवा जुलाब असे एखादेच लक्षण दिसू शकते. मात्र, त्यावरून कोरोनाचे निदान करता येत नाही. असे रुग्ण आपोआप बरे झाले आहेत. प्रत्येकाच्या शरीरात रोगाच्या विरोधात अँटिबॉडी, टी सेल्स, बी सेल्स तयार होत असतात. वय वाढले किंवा मधुमेह, रक्तदाब असे आजार बळावले तर शरीराची अँटिबॉडी तयार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अशा लोकांना संसर्ग पटकन होतो. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर शरीर संसर्गाविरोधात लढा देते. लस येईपर्यंत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'
---
सिरो सर्व्हेनुसार, २५ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. हर्ड इम्युनिटीपासून आपण खूप लांब आहोत. एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकांना लागण झाली तरच हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते. मात्र, अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर सहन होऊ न शकणारा भार येऊ शकतो. आताच आपल्याकडे ९७ टक्के हॉस्पिटल, तर ९९ टक्के आयसीयू फुल्ल आहेत. कोरोना गंभीर किंवा जीवघेणा आजार नाही, हे मृत्यूदरावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हीच सध्याची आयुधे आहेत.
- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ
-----
रॅपिड अँटिजेन टेस्टिंग वाढल्याने पुण्यातील रुग्णसंख्या वाढली आहे. अँटिबॉडी टेस्ट केल्यास नेमकी रुग्णसंख्या जाणून घेता येऊ शकते. मात्र, या टेस्टची क्षमता आणि विश्वासार्हता याबाबतची खात्री पटायला हवी. ज्या लोकांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्या असतील त्यांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे सिद्ध होते. टेस्टच्या आधारावर धोरण ठरवताना टेस्ट अधिकाधिक अचूक असायला हवी. कोणतीही टेस्ट किंवा किट वापरताना त्याची अचूक ट्रायल व्हायला हवी. शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये रँडम सॅम्पल टेस्टिंग झाले तर कोणत्या भागात जास्त संसर्ग होऊ शकतो, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. यासाठी टेस्टिंगमध्ये सर्व भाग समाविष्ट झाले पाहिजेत. यातून अँटिबॉडी किती जणांमध्ये विकसित झाल्या आहेत, याची कल्पना येऊ शकते. कोरोनासंदर्भात कोणतेही धोरण ठरवताना सध्या तरी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, स्वच्छता याला पर्याय नाही.
- डॉ. विजय नटराजन, संचालक, सिन