पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवार (दि.१९) पासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्षष्ट केले आहे. परंतु शहरातील मुख्य बाजार आवार आणि उपबाजार सुरू करण्यासाठी भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करण्याची वेळ ही सकाळी ८ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आली होती. परंतु याबाबत जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ वाढून देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाल्याने रविवारी भाजीपाला व फळे, कांदा व बटाटा व्यापार सुरू राहणार नसल्याचे आडते असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे, भाजीपाला, व कांदा- बटाट्याचा व्यापार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ जुलै ते १८ जुलैपर्यंत पुणे शहरामध्ये संपूर्ण लॉकडाऊन केलेल्याने बंद आहे. त्यानंतर १९ जुलैपासून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला होता व यासाठी दिनांक १९ जुलैपासून सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये भाजीपाला व आडत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शासनाच्या सदर आदेशामध्ये पुणे मार्केटयार्ड मुख्य बाजार आवार व त्याचप्रमाणे उपबाजार याचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता.यामुळे शुक्रवार ( दि.१७ ) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे. देशमुख यांच्याशी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ व पुणे मर्चंट चेंबर चे अध्यक्ष पोपट ओसवाल संपर्क साधला होता. त्यानुसार बी.जे. देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून फळे, भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करणेची वेळ ही सकाळी ८ ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल.परंतु, शनिवारी सायंकाळ पर्यंत जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्याकडून याबाबत कोणतेही उत्तर अथवा स्षष्ट आदेश आले नाही. यामुळे प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत फळे भाजीपाला व कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे विलास भुजबळ यांनी स्पष्ट केले.
Corona virus : मार्केटयार्ड पुढील आदेश येईपर्यंत राहणार 'लॉक'च; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 7:33 PM
प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे भाजीपाला फळे, कांदा व बटाटा व्यापार राहणार नसल्याचे स्पष्ट
ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवारपासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार