Corona virus : मुख्यमंत्री म्हणतात, काळजी करू नका; पुण्यावर अजित दादांचं लक्ष आहे.!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 03:07 PM2020-07-30T15:07:55+5:302020-07-30T15:14:14+5:30
लोकप्रतिनिधी , प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय राखणे गरजेचे आहे.
पुणे : कोरोना ही एक राज्यावर आलेली आपत्तीच आहे. भविष्यातील परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण आहे. या परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वैद्यकीय यंत्रणेशी समन्वय राखणे गरजेचे आहे. मात्र, कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन व आरोग्ययंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. आणि पुण्यातील परिस्थितीवर अजित दादा खूप बारकाईने लक्ष ठेवून काम करत आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, सुरुवातीला मुंबईतील परिस्थिती देखील गंभीर होती. काहीच कळत नव्हते नेमकं काय करावे.कारण कोरोना या महामारीवर कोणतेही औषध नाही. फक्त कोणत्या औषधांनी रुग्ण बरे वाटेल हे सर्व अंदाजच होते. मात्र काही ठोस निर्णय घेत मुंबई तातडीने टास्क फोर्स स्थापन केले. चाचण्या, औषधोपचार सर्व गोष्टीवर चर्चा केली.. सुरूवातीला सगळ्याच यंत्रणा खुप पॅनिकमध्ये होत्या. नंतर परिस्थिती आटोक्यात येत गेली. या परिस्थितीत व्हेंटिलेटर पाहिजेच परंतु, व्हेंटिलेटर पेक्षा ऑक्सिजन जास्त उपयोगी ठरत आहे. केंद्राकडून व्हेंटिलेटर आले आहेत.
मुख्यमंत्री यांनी सांगितले की, पुण्याचीच नाही तर सर्वच महापालिकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. राज्य शासन केंद्राकडे मागणी करत आहेच. शक्य तेवढी सगळी मदत करणार आहे. त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय पाहिजे. वेळमारुन नेण्यासाठी लाॅकडाऊन करतो अस नाही.. जम्बो फॅसिलिटीज निर्माण करण्यासाठी या काळाचा उपयोग झाला.
- पुण्यात देखील अनेक खासगी हाॅस्पिटल आहेत. बेडस् उपलब्ध होत नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावली पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणात कोरोनाबद्दल जनजागृती केली पाहिजे. राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर संकटात जग, देश यांच्यासह अन्य राज्यांचा अनुभव घेतला आहे. अजून राज्यात कोरोनाची लाट संपलेली नाही, आणखी किती लाटा येतील याची माहिती नाही. औषधे येतील.. पण आता आपल्याला कोरोनासोबत जगायला पाहिजे, असेही ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.