पुणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परंतु, पालिकेने कोरोनाचा प्रसार होण्याच्या शोधलेल्या कारणांपैकी रुग्णाच्या थेट संपर्कात आल्याने लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ७८.६७ टक्के असल्याचे दिसत आहे. तर, जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्यांकडून झालेले संक्रमण अवघे १.१४ टक्के असल्याने दुकाने बंद ठेवणे अथवा सर्व व्यवहार बंद ठेवणे हा त्यावरील उपाय असू शकत नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे।
पालिकेकडून संशयित रुग्ण शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक, पालिकेने सुरू केलेल्या मोबाईल रुग्णवाहिका, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, क्लिनिक्स, विदेशातून आलेले प्रवासी, जीवनावश्यक सेवा, पालिका कर्मचारी आणि स्वतःहून पुढे आलेले नागरिक अशी वर्गवारी पालिकेने केलेली आहे. या वर्गवारीमधून कोणत्या वर्गात रुग्णांचे किती प्रमाण आहे याची आकडेवारी पालिकेने जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिक हे रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधित झाल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे. तर, विदेशातून आलेल्यांची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामधून ४ हजार ८६४ नागरिकांच्या तपासणीची शिफारस करण्यात आली होती. यातील ५६१ नागरिक बाधित असल्याचे निष्पन्न झाले. याचे एकूण रुग्णांच्या तुलनेतील प्रमाण १.८४ आहे. स्वतःहून तपासणीसाठी पुढे आलेल्या नागरिकांपैकी ३ हजार ६२३ नागरिक बाधित असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे नागरिकही स्वतःहून पुढे येत असून चाचणी करून घेत आहेत. नागरिकांमध्येही स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता असल्याचे दिसत आहे. यासोबतच खासगी दवाखाने आणि विदेशातून आलेल्या प्रवाशांमधील रुग्णांचे प्रमाण अत्यन्त कमी आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोक अधिक बाधित होत असल्याचे दिसत असल्याने त्यांच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'वर अधिक भर दिला जात आहे.
रुग्णसंख्येत सर्वात वरच्या स्थानी असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राबविलेल्या उपाययोजनांमध्ये 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'वर सर्वाधिक भर देण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे या उपाययोजनेवर लक्ष केंद्रित करून रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे शक्य होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यामुळे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहिल्याने रुग्णसंख्या वाढते असे आतापर्यंतच्या आकडेवारीतून तरी स्पष्ट होत नाही.
---------
रुग्णसंख्येची वर्गवारी वर्ग तपासणी बाधित टक्केवारी प्रथम संपर्क १,१४,३९१ २४,०१२ ७८.६७
मोबाईल रुग्णवाहिका १२, ५३८ १,५६७ ५.१३
घरोघरी सर्वेक्षण ४,८६४ ५६१ १.८४
दवाखाने ६,०९६ १४८ ०.४८
विदेश प्रवासी ५,९५२ ३८ ०.१२
महापालिका कर्मचारी -- २२६ ०.७४
अत्यावश्यक सेवा -- ३४८ १.१४
स्वतःहून पुढे आलेले -- ३,६२३ ११.८७