लक्ष्मण मोरे पुणे : महापालिकेचे मुळातच घटलेले उत्पन्न आणि कोरोनावरील वाढता खर्च पाहता पालिकेची कसरत होणार असून राज्य शासनाकडूनही अपेक्षित मिळत नसल्याची ओरड पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. तुर्तास पालिकेलाच सर्व खर्च उचलावा लागत असून दरमहिन्याला २० ते २५ कोटींच्या घरात खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला एकीकडे कोरोनावरील खर्चाची तरतूद करतानाच दुसरीकडे मात्र उत्पन्न वाढीवर कटाक्षाने भर द्यावा लागणार आहे. पालिकेने स्वॅब तपासणीची संख्या वाढविली आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. जुलैअखेरीस एकूण बाधितांचा आकडा ४७ हजार तर अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा २० हजारांच्या घरात असेल असा पालिकेने अंदाज बांधलेला आहे. पालिकेने १० खासगी रुग्णालयांसोबत करार केले असून तेथे कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. पालिकेकडून या रुग्णांच्या उपचारांचा खर्च दिला जाणार आहे. यासोबतच शहरी गरीब योजना, महात्मा फुले आरोग्य योजनांसारख्या योजनांवरही खर्च होणार आहे. राज्य शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने पालिकेलाच मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. पालिकेने नुकत्याच ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’कीटसाठीही खर्च केला आहे.
खासगी रुग्णालयांच्या खर्चासोबतच स्वात तपासणी, विलगीकरण केंद्र, तेथील व्यवस्था, यंत्रणा, औषधोपचार, जेवण आणि अन्य सुविधांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. प्रशासनाला आवश्यकतेनुसार खरेदी आणि खर्च करण्याचे अधिकार कलम ६७ (३) क नुसार देण्यात आले आहेत. प्रशासनाने गेल्या आठवड्यापर्यंत तब्बल १४७ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती स्थायी समितीला दिली आहे. अद्यापह काही हॉस्पिटल्सची बिले देणे बाकी आहे.====प्रशासनाने कोरोनासह वैद्यकीय खर्चावर दरमहा १०० कोटी खर्च होतील असे स्थायीला सांगितले. पालिकेची खर्च करण्याची क्षमता नाही. त्यामुळे राज्य शासनाकडे मदतीची मागणी केली जात आहे. शासनाची मदत येत नसल्याने आजची आवश्यकता पालिका खर्च करुन भागविते आहे. पुणेकरांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्वाची आहे. परंतू, खचार्चा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे आम्ही पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देत आहोत. जीएसटीचे एकूण ६५० आणि मिळकत करामधून ७०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. जुलैअखेरीस उत्पन्नात आणखी वाढ होईल.- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती=======पालिकेची होणार कसरत : राज्य शासनाकडूनही मिळेना अपेक्षित मदत======महापालिकेच्या लेखा विभागाकडील माहितीनुसार आतापर्यंत दहा ते बारा कोटी रुपये प्रत्यक्षात खर्ची पडले असून जवळपास १५० ते १७५ कोटी रुपयांचे कार्यादेश ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आले आहेत. यामध्ये मास्क-सॅनिटायझर-पीपीई कीट खरेदी, औषधांची खरेदी, ऑक्सिजनची खरेदी, विविध उपकरणे, डॉ. नायडू रुग्णालयामधील सुधारणा, कोविड केअर सेंटर्सची उभारणी, या सेंटरमधील गाद्या, बेड, उशा, चादरी, टूथपेस्ट-टूथब्रशसह जेवण आदींचा खर्च, दहा रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांचा खर्च, विविध शाळांमध्ये ठेवण्यात आलेले भिक्षेकरी, फिरस्ते यांच्यावरील खर्च, शहरातील विविध भागात कंटेन्मेंट झोनमध्ये लावण्यात आलेले पत्रे आदींचा खर्च समाविष्ठ आहे.======यामध्ये सर्वाधिक खर्च आरोग्य विभागाचा असून हा खर्च ८० कोटींच्या पुढे झाला आहे. यासोबतच रुग्णवाहिकांचे इंधन, चालक, अधिकारी व डॉक्टर्स यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या वाहनांचा खर्च जवळपास 15 कोटींच्या घरात आहे. तर, कोविड केअर सेंटर्सच्या उभारणीसह अन्य खर्च १२ कोटींच्या पुढे गेला आहे. यासोबतच विद्यूत विभाग, सीसीटीव्ही आदींचाही खर्च झालेला आहे.======राज्य शासनाकडून आतापर्यंत पालिकेला कोरोनासाठी अवघी तीन कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. पालिकेकडून मदतीसाठी सतत पाठपुरावा केला जात असून १०० ते १५० कोटी रुपये तातडीने मिळावेत अशी मागणी पालिकेने राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहारही सुरु आहे.=====
स्थायी समितीकडे आम्ही अंदाजपत्रकातील २०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आतापर्यंत साधारणपणे १५० कोटींच्या आसपास खर्च झालेला असून आणखी ५० कोटींची आवश्यकता पुढील दोन महिन्यांसाठी लागणार आहे. कोरोनावर दरमहा साधारण २० ते २५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांपर्यंत कोरोनावर २०० कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. - शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महानगरपालिका