पुणे : मुंबई येथील घाटकोपर भागात बंदोबस्ताला गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील सी कंपनीचे १४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे गट २ मधील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मुंबईहून बंदोबस्त करुन आलेले १ अधिकारी व ७ जवान कोरोनाचे शिकार झाले होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहे.याबाबत सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, राज्य राखीव दलाची सी कंपनीतील १०० जवानांची तुकडी १० एप्रिल रोजी पुण्यातून मुंबईत बंदोबस्तासाठी गेली होती. ही तुकडी २१ मे रोजी पुन्हा पुण्यात परत आली.त्यांना सध्या कंपनीच्या अलंकार हॉल तसेच महापालिकेच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या तुकडीतील सर्वांची गटागटाने कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. सी कंपनीतील १४ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या कंपनीतील आणखी १० जवानांचे अहवाल येणे बाकी आहे.याबरोबर बी कंपनीमधील १०० जवानांना महादजी शिंदे हायस्कुल आणि गिरजे कॉलेज या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी ७७ जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.त्यांच्यापैकी एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. अद्याप २३ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.यापूर्वी राज्य राखीव दलाची एक तुकडी मुंबईत बंदोबस्ताला गेली होती.त्यातील १ अधिकारी व ७ जवान यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या ते पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून पुन्हा डयुटीवर कार्यरत आहेत. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एकाला त्रास होत असल्याने त्याची तपासणी केल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आता हे जवान बरे झाले असल्याची माहिती सहायक समादेशक उत्तेकर यांनी दिली.