पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरातील कोणताही वर्ग कोरोनाच्या संसर्गापासून वंचित राहिलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या विळख्यात घेतलेला कोरोना आता नगरसेवकांपर्यंत पोहचला असून एका नगरसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्यापुढे गेली असून कसबा-विश्रामबाग, भवानी पेठ, येरवडा-कळस-धानोरी, शिवाजीनगर-घोले रस्ता या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आता एका नगरसेविकेलाच लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.कोरोनाच्या संकटात महापालिकेचे अनेक नगरसेवक नागरिकांना मदत करीत आहेत. अन्नधान्य किंवा अन्य स्वरूपाची मदत देताना तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना नगरसेवकांचा थेट नागरिकांशी संपर्क येत आहे. नगरसेवक कार्यकर्त्यांसह गर्दी करत आहेत. शहराच्या पूर्व भागातील एका नगरसेविकेसह तिच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांचे स्वाब टेस्टिंगचे रिपोर्ट मंगळवारी प्राप्त झाले. त्यामध्ये हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.