पिंपरी : कोरोनाचा (कोविड १९) वेगाने प्रसार होत असतानाही ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी झटणाऱ्या तब्बल २४९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १५८ जणांनी कोरोनावर मात केली असून, आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळामध्ये ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देता यावा या साठी महावितरणचे कर्मचारी आघाडीवर राहून झटत होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे विभागातील महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. पिंपरी चिंचवडसह मुळशी, वेल्हा, खेड, मावळ, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील वीज यंत्रणा जमीनदोस्त झाली होती. या कालावधीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वादळी वारे आणि पावसाची तमा न बाळगता पुणे परिमंडळातील ३१ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र काम केले.
दरम्यान, पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणच्या विविध कार्यालयातील २४९ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १५८ जणांनी कोरोनावर मात केली. तर आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, अजुनही ८३ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, दीडशे अधिकारी आणि कर्मचारी खबरदारी म्हणून विलग कक्षात थांबले आहेत.