पुणे: सर्वसामान्य नागरिकांनंतर आता पोलीस कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात आणखी एका महिला रुग्णाची भर पडली आहे. सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) विभागात काम करणाऱ्या महिलेला कोरोना झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्या शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
संबंधित महिला गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची एका पोलीस ठाण्याअंतर्गत ड्युटी लावण्यात आली होती. मागील तीन दिवसांपासून त्यांना खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता. तरीही त्या ड्युटीवर येत होत्या. बुधवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता संबंधित पोलीस ठाण्यात गुरुवारी सॅनिटायझर फवारणी केली जाणार असल्याचे सूत्राकडून समजले.