पुणे : ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता एक वरिष्ठ डॉक्टरही बाधित झाले आहेत. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील वॉर्ड क्रमांक २७ व २८ मध्ये कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांवर देखरेख करणाऱ्या प्रमुख डॉक्टरांपैकी ते एक होते. त्यामुळे रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे.
ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांना चार दिवसांपुर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयामध्ये कोरोनाची रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्यांना जुन्या इमारतीतील वॉर्ड क्रमांक २७ व २८ मध्ये ठेवण्यात आले होते. तिथेच या परिचारिका कार्यरत होत्या. या दोन्ही वॉर्डची मुख्य जबाबदारी दोन वरिष्ठ डॉक्टरांवर होती. रुग्णांवरील उपचार, नियोजन, समन्वय आदी कामे त्यांच्याकडे होती. तसेच नायडू रुग्णालयात ते जात होते. पण त्यातील एका डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. कोरोनाबाधित डॉक्टर रुग्णालयातील एका विभागाचे प्रमुखही आहेत. यापार्श्वभूमीवर काही डॉक्टर व परिचारिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.---------------डॉ. तांबे यांनी स्वीकारली सुत्रडॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीनंतर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांंच्याकडे पदभार सोपविण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र, डॉ. तांबे हे वैद्यकीय रजेवर असल्याने शुक्रवारी ते रुग्णालयात हजर नव्हते. त्यामुळे डॉ. चंदनवाले यांनी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविला होता. आता डॉ. तांबे यांनी शनिवारी शिंत्रे यांच्याकडून सुत्र आपल्या हातात घेतली.------------------