पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. पुणे शहरात बुधवारी २५०० च्या वर तर संपूर्ण जिल्ह्यात ५०००च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन यंत्रणा प्रचंड हादरली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांवर आणखी कठोर निर्बंध लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा प्रशासन यंत्रणा आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याच धर्तीवर मागील आठवड्यात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय न घेता रात्री १० वाजता संपूर्ण पुणे 'लॉक' करण्याचा आदेश दिला होता. तसेच या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतरही शहरात १० नंतरही नागरिकांची वर्दळ असलेली पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी हॉटेलसह इतर गोष्टी १० नंतर देखील सुरु असल्याचे पाहायला मिळत होते.
त्यातच आज फक्त रुग्णसंख्याच नाही तर पॉझिटिव्हिटी रेट देखील वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज काही बैठकांसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे मुंबईत आहेत. त्यामुळे आणखी काही निर्बंधांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत विचार सुरु असुन चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे.
एकूण पॉझिटिव्हिटी रेट देखील २५ टक्क्यांच्या आसपास
पुणे जिल्ह्यात बुधवारी ( दि. १७) दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. आणि एकूण पॉझिटिव्हिटी रेट देखील २५ टक्क्यांच्या आसपास गेला आहे. इतक्या प्रमाणातील वाढ हे काळजीचे कारण बनले आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यातच बुधवार आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविली गेली. बुधवारी दिवसभरात २ हजार ५८७ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ७६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ३२ झाली आहे.
पिंपरीतही धोका वाढला पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. निगडी प्राधिकरण, थेरगाव, सांगवी आणि भोसरी परिसरात धोका वाढला आहे. बुधवारी दिवसभरात १ हजार २४८ जण पॉझिटिव्ह सापडले होते तर दिवसभरात ६१५ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार ३९० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार ४०७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५०६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ७५९ वर पोहोचली आहे.