पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी संख्या थेट ५0 टक्क्यांवर आणल्याने शासकीय कामांचा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांची बिले काढून घेण्याकरिता ठेकेदारांची लगबग सुरू असून, ३१ मार्चनंतर नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालिकेच्या ‘मार्च एंड’वर कोरोनाचे सावट घोंगावत आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकाने सात हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दरवर्षी पालिकेकडून शहरात विकासकामे केली जातात. रस्ते, पाणी, मलनि:सारण, विद्युत आदी कामे केली जातात. ठेकेदारांमार्फत होणारी ही कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. नगरसेवकांच्या निधीमधून ही कामे केली जातात. यासोबतच प्रशासनाकडूनही काही कामे सुचवली जातात. दर वर्षी सरासरी ४०० ते ५०० कोटी रुपयांची बिले ही एकट्या ३१ मार्चच्या आसपास येतात. पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडून या बिलांची पडताळणी केली जाते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बिले आणि कामाच्या फाईल्स येण्याचे प्रमाण वाढते. या कालावधीत लेखापरीक्षण विभागाला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले. उपलब्ध मनुष्यबळही कमी पडू लागते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला असतानाच पालिकेमध्ये मार्च एंडची लगबग सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केलेले आहे. त्यामुळे अन्य व्यवहार व विकासकामेही ठप्प आहेत. ठेकेदारांना कामे करणे आणि त्याची बिले वेळेत सादर करणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षातील बिले अदा करणे ३१ मार्चपर्यंत शक्य होणार आहे की त्यासाठी मुदतवाढ घेण्यात येणार, याकडे लक्ष लागले आहे.
Corona virus : पुणे महापालिकेच्या ‘मार्च एंड’वर कोरोनाचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 6:59 PM
महापालिकेच्या विविध विकासकामांची बिले काढून घेण्याकरिता ठेकेदारांची लगबग सुरू
ठळक मुद्दे४०० ते ५०० कोटींची बिले : लेखापरीक्षण विभागावर वाढला ताण