नीलेश राऊत-पुणे : महापालिकेच्या हॉस्पिटल तथा खाजगी हॉस्पिटलमध्ये, लक्षणे असलेल्या रूग्णांना केवळ अहवाल निगेटिव्ह आल्याने, प्रवेश नाकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या व ‘न्यूमोनिया’ असूनही उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र शहरात काही प्रमाणात पाहण्यास मिळत आहे.विशेष म्हणजे अशा रूग्णांपैकी बहुतांशी जणांची दोन-तीन दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी केल्यावर ते कोरोनाबाधित असल्याचेच स्पष्ट झाल्याचे वारंवार दिसून आले आहे. यामुळे अशा रूग्णांकरिताही काही बेड हॉस्पिटलमध्ये राखीव ठेवणे गरजेचे झाले आहे. पुणे शहरात आजमितीला दररोज सरासरी पाच हजार कोरोना संशयितांची चाचणी केली जाते. यामध्ये लक्षणे असलेल्या काही जणांचे तपासणी अहवाल हे निगेटिव्ह येतात. तर अँटिजेन म्हणजेच रॅपिड टेस्टमध्ये निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना, लक्षणे असल्याने पुन्हा आरटीपीसीआर (स्वॅब) तपासणी करण्याचे सांगण्यात येते़ या तपासणीतही काहींचे अहवाल पुन्हा निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरीच उपचाराचा सल्ला दिला जातो. पण यापैकी अनेकांना निमोनिया असल्याने त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत जाते, व संबंधितांना हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे आवश्यक बनते.अशावेळी रूग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते़ त्यातच अहवाल निगेटिव्ह आहे पण कोरोनाची लक्षणे आहेत, अशा रूग्णांसाठी शहरात सध्या तरी कुठेही राखीव बेड नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा रूग्णांपैकी बहुतांशी रूग्णांची दोन-तीन दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी केल्यास त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ट येत आल्याने, संबंधितांना वेळीच उपचार मिळणे हे महत्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक डॉक्टर सध्या कोराना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला तरी, संबंधितास ‘एचआरसीटी’ (हाय रिशोलेशेन कम्प्युटराईज् टोमोग्राफी टेस्ट ) चा सल्ला देतात. तसेच या तपासणीत २५ स्कोर पैकी १० पेक्षा अधिक स्कोर असलेल्या रूग्णांना लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन, वेळेत उपचार घेण्याचे सांगण्यात येते. परंतु, अहवाल निगेटिव्ह असल्याने वेळेत बेड न मिळाल्याने, त्यांच्यात निमोनियाचा प्रभाव अधिक वाढू लागून त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनते. त्यामुळे अशा रूग्णांकरिताही महापालिकेने बेड राखीव करावे अशी मागणी होऊ लागली आहे. -----------------------------आयसोलेशन सेंटरमध्ये अशा रूग्णांना दाखल करून घेण्याची महापौरांची सूचना लक्षणे आहेत, पण कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला म्हणून कोणीही संबंधित रूग्णाला नाकारू नये़ अशा रूग्णांसाठी काही बेड राखीव ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनास केली असून, या रूग्णांना दाखल करून घेण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या ११ कोविड केअर सेंटरपैकी बहुतांशी ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असला व तरीही कोरोनाची लक्षणेही दिसून येतात, अशा रूग्णाने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे़ असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.---------------------------------दोन-दोनदा तपासणी करूनही अहवाल निगेटिव्ह कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत, निमोनियाही आहे. अशा रूग्णांकडून दोन-दोनदा रॅपिड तथा आरटीपीसीआर चाचणी करूनही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचा प्रकार नुकताच शहरात घडला आहे.परंतु, उपचारासाठी दाखल केल्यावर पुन्हा चाचणी करण्यात आली असता संबंधित रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. परिणामी आरटीपीसीआर च्या चाचणीकरिता स्वॅब घेताना तो योग्य रितीने घेतला जातो का, स्वॅब गोळा करणारा कर्मचारी प्रशिक्षित आहे का याकडे विशेष लक्ष संबंधित यंत्रणेने देणे जरूरी आहे.
Corona virus : कोरोना चाचणी निगेटिव्ह, मात्र लक्षणे असतानाही रूग्णांना हॉस्पिटलमध्ये मिळेना बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 1:22 PM
वेळेत उपचार मिळावे म्हणून होतेय धावपळ
ठळक मुद्देपुणे शहरात आजमितीला दररोज सरासरी केली जातेय पाच हजार कोरोना संशयितांची चाचणी दोन-दोनदा तपासणी करूनही अहवाल निगेटिव्ह आयसोलेशन सेंटरमध्ये अशा रूग्णांना दाखल करून घेण्याची महापौरांची सूचना