राजू इनामदार
पुणे: टाळेबंदीतही शहर स्वच्छ ठेवणार्या महापालिकेचे स्वच्छता कर्मचार्यांंना रोजच कोरोना विषाणूबरोबर सामना करावा लागत आहे. १३ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत या लढ्यात प्राण गमावले आहेत. ३१३ जण बाधित आहेत. त्यात ६३ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.
मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून १ कोटी रूपयांची मदत देण्याचे जाहीर झाले असले तरी अद्यपी त्यादृष्टीने काहीही हालचाल झालेली नाही. स्वच्छता कर्मचारी कोरोना हल्ल्यात सापडण्याची जास्त शक्यता असल्याने त्यांच्यासाठी महापालिकेने उपचारांची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी कर्मचारी युनियनने केली आहे. प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचारी दुर्लक्षित होत असल्याचे युनियनने म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनाने त्यांंना आतापर्यंत चतुर्थ श्रेणीतील सफाई कामगारांना फक्त एकदाच एक साबणाची वडी, दोन कापडी मास्क, २०० मिलीची सॅनिटायझर एक बाटली, दोन हँडग्लोज देण्यात आले. त्यानंतर आजतागायत त्यांच्यासाठी कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यांना कोणतीही साधने व माहितीही दिली जात नाही.
कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत कर्तव्य बजावत असताना २५० कायम व ६३ कंत्राटी कर्मचारी अशा एकूण ३१३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातल्याच १२ कायम व १ कंत्राटी अशा १३ जणांचे कोरोनामुळे निधन झाले. सध्या कायम १०६ व २६ कंत्राटी कर्मचारी असे एकूण १३२ कर्मचारी कोरोना बाधित म्हणून वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये दाखल आहेत.१३२ कायम व ३६ कंत्राटी असे एकूण १६८ कर्मचारी कोरोनावर मात करून आपापल्या घरी परतले.
प्रशासनाने मृत झालेल्या कोरोना रूग्णाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार किंवा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे वगैरेची जबाबदारीही स्वच्छता कर्मचारी वर्गावर सोपवली आहे. त्याशिवाय घरातच विलगीकरण केलेल्या रूग्णांचा कोविड कचरा जमा करण्यासाठी २०० कर्मचार्यांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. युनियनची कामाबाबत तक्रार नाही, मात्र असे थैट जीवावर बेतणारे काम देताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र प्रशासनाने घेतलेली नाही.
-------//
प्रशासनाने जबाबदारी घ्यावी
स्वच्छता कर्मचार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काम देणार्या संस्थेने म्हणजे पालिका प्रशासनाने घ्यायलाच हवी. हे कर्मचारी गरीब आहेत. त्यांंना रूग्णालयात बेड मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या ऊपचारासाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी, निधन झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना त्वरीत मदत द्यावी अशी आमची मागणी आहे.
उदय भट, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी युनियन.(३२२)