Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:28 PM2020-09-02T16:28:22+5:302020-09-02T16:29:16+5:30
बारामतीत कोरोना रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला..
बारामती : बारामती शहर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.गेल्या २४ तासात ११० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.१०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. येथील रुग्णांची संख्या १०११ पर्यंत पोहचली आहे. प्रशासनाने बारामतीकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मंगळवारी(दि. १) बारामतीमध्ये एकूण घेतलेल्या आरटीपीसीआर १४८ टेस्ट पैकी ७२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच ३६ जणांच्या शासकीय एंटीजेन नमुन्यापैकी १८ जणांचा पॉझिटीव्ह आला आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले ६३ नमुन्यात पैकी २१ जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आहे. आज सकाळपर्यंत ११० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.यामध्ये शहर ६१, ग्रामीण मधील ४९ जणांचा समावेश आहे. तसेच २४ तासांत एकुण सहाजणांचा मृत्यु झाला आहे. बारामती शहरात आजपर्यंत एकुण ४१ जणांचा मृत्यु झाला आहे.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण काळजी घेणे अत्यावश्यक आहे .तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहे.त्यांच्या संपर्कात असणाऱ्या नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे.आपणाला प्रशासनामार्फत संपर्क साधला जाणार आहे. लक्षण विरहित रुग्णांनी अॅडमिट होण्यासाठी घाई करू नये .सर्वांना संपर्क साधला जाईल. कृपया प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.
तसेच अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत .त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. सर्व कामावर जाणाºया तरुणांनी कामावरून घरी आल्यानंतर आपल्या ज्येष्ठ आई-वडील, आजी-आजोबा यांपासून सुरक्षित अंतरावर राहावे . त्यांच्याशी बोलताना घरांमध्ये सुद्धा मास्क वापरावे ज्यामुळे त्यांना होणारा कोरोणा प्रादुर्भाव टाळता येईल,असे आवाहन डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.