पिंपरी : पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी मध्यरात्री स्कॉटलँडहून पुण्यात दाखल झालेला एक युवक आपल्या आई वडिल आणि नोकरासह नायडू रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही संस्थेकडे पाठवले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पिंपरीत फिलिपिन्समधून आलेल्या व्यक्तीच्या भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण २१वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण संशयित होते. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५२ वर पोहचली आहे. तसेच ५ जणांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील संशयित २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टोपे त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पिंपरीत दोन दिवसांपूर्वी दोघे भाऊ परदेशातून आले होते. त्यामधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या भावाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी ( दि. २०) सकाळी आलेल्या अहवालातून समोर आले आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी त्यांचे घश्यातील द्रव्याचे नमुने पाठविले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून, एक रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बाधितां संख्या 12 असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
चीनमध्ये कोरोना विषाणूने दहशत माजविली होती. त्यानंतर हा विषाणू भारतात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातून आजपर्यंत एकूण ९२ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी उपचारार्थ दाखल अकरा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. बुधवारी १२ व्यक्तींचा घश्यातील द्राव्याचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. त्याचे अहवाल गुरूवारी सायंकाळी आले, सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते.