पुणे :खरेदी झाली, पत्रिका वाटल्या, ग्रहमग झाले, देवक बसले आणि लग्न मात्र पुढे ढकलावे लागले. ही गोष्ट आहे पुण्यातील अश्विनी जमदाडे आणि प्रवीण कदम यांची. कोरोनामुळे त्यांनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच ते विवाहगाठ बांधणार आहेत . स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय कौतूकास्पदच म्हणायला हवा.
१९ मार्चला पुण्यात अश्विनी आणि प्रवीण विवाहबद्ध होणार होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने त्याठिकाणी कमीतकमी नातेवाईक असावेत अशी विनंती करण्यात येत आहे. हाच विचार मनाशी धरून जमदाडे आणि कदम कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना नियोजित वधूची आई सुनीता जमदाडे म्हणाल्या की, 'मुलीचं लग्न हे प्रत्येक आईचं स्वप्नं असतं. मनात एक धाकधूक असते. सुरुवातीला कोरोनाबद्दल ऐकलं तेव्हा त्याचा प्रभाव आमच्या कार्यावरदेखील पडेल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा पुण्यात सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून होतो. अखेर सरकारने केलेल्या सूचनांचा विचार केला आणि दोन्ही कुटुंबांनी तारीख पुढे घेण्याचे ठरवले. नियोजित वधू अश्विनी म्हणाली की, 'लग्न पुढे गेल्याचं दुःख आहेच. पण त्यातून उद्या कोणाला प्रादुर्भाव झाला तर ते अधिक वाईट असेल. शेवटी लग्न जरी आमचं असलं तरी नातेवाईक आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आता सगळे विधी झाले आहेत, आज खरं तर हातावर मेहंदी रंगली असती पण सगळेच आता पुढे ढकलले आहे
नातेवाईकांना कळवण्याची कसरत
जमदाडे कुटुंबीयांनी नातेवाईक, आप्तजन यांना लग्नपत्रिका वाटल्या होत्या. इतकेच नव्हे तर वोट्स ऍपवरूनही आमंत्रणे गेली होती. मात्र दोन दिवस आधी हा निर्णय घेतल्याने त्यांनी फोन करून नातेवाईकांना न येण्यास सांगितले आहे. अजूनही त्यांचे काहींना फोन सुरु आहेत. अर्थात त्यामागचे कारण ऐकल्यावर अनेकांनी कौतुक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.