पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय कायमस्वरूपी राहू शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण संपूर्ण देशात वाढतच राहणार आहेत. अशावेळी कोरोनाबाधित व्यक्तींना वेळेत उपचार देणे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला दिल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासह डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी यांच्या पथकाने पुण्याचा पाहणी दौरा केला. या पथकाने गेली दोन दिवस पुणे शहरात विविध ठिकाणांना भेटी देऊन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना याबाबत सूचना दिल्या. यामध्ये त्यांनी आता यापुढील काळात कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी कसे होतील, यादृष्टीने चाचण्या वाढविणे आणि आरोग्य व्यवस्था उभी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे नमूद केले आहे. लॉकडाऊन उठल्यावर दैनंदिन व्यवहारात प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत: घेणे हेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनसह संपूर्ण शहरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी लागेल याबाबत जनजागृती करणे जरुरीचे आहे. आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे. व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे. पुणे शहरात प्रामुख्याने मृत्यू दर कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व अन्य आजार असलेल्या व्यक्तींच्या आरोग्य तपासण्या करण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासण्या करून, पॉझिटिव्ह रुग्णांवर वेळेवर उपचार करणे हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ज्या कोरोना बधितांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करून भविष्यात त्या कारणाने मृत्यू होणार नाही याची काळजी घेणे जरुरी आहे. यासाठी प्रशासकीय व्यवस्था व आरोग्य व्यवस्था यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे निरीक्षण ही या पथकाने पुण्यातील पाहणीत नोंदविले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. जेवढ्या जास्त तपासण्या तेवढ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा मजबूत करताना आय.सी. यु. बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची अधिकाधिक उपलब्धता करून संभाव्य मृत्यू टाळणे यासाठी प्राधान्याने काम करावे असेही या पथकाने सांगितले आहे.
Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 5:46 PM
आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे.
ठळक मुद्देकेंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा पुण्याचा पाहणी दौरा कोरोनाबाबत शहरातील सद्यस्थिती व भविष्यातील उपाययोजना याबाबत सूचना