पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन दलाकडून रस्ते निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामध्ये सोडियम हायपोक्लोराइटचा वापर करण्यात आला. लोकांच्या जीवांचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाकडून आपत्कालीन परिस्थितीतही मदत मिळत असल्याचे दिसून आले.
सध्या पुण्यात २३ कोरोनाबाधित रुग्ण असून राज्यात ६४ रुग्ण आहेत. ही संख्या नियंत्रणात रहावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून या भागात फवारणी केली गेली. कोरोना विषाणूंचे संक्रमण अजून पसरू नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना आता पुण्यात येणाऱ्या कोणत्याही रस्त्यावरून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती परदेशातून आणि त्यातही कोरोनाग्रस्त देशातून आली असेल तर तात्काळ स्क्रिनिंग केले जात आहे. त्यापुढे जाऊन आता प्रशासनाकडून जंतूनाशक औषधाची फवारणी केली जात आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे,अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवानांनी १५ किलोमीटरपर्यंत फवारणी केली. यावेळी अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.