मंचर: आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण साकोरे या गावात सापडला आहे .मुंबईवरून आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे .प्रशासनाने गावात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत गावच्या सीमा सील केल्या आहे. सदर व्यक्ती राहत असलेल्या घरातील 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे .आंबेगाव तालुक्याने मागील दीड महिन्यापासून कोरोनाविरुद्ध चांगला लढा देत कोरोनाला रोखले होते .मात्र आता कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाला आहे. मुंबई येथून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात येत आहेत. त्यांच्या मार्फतच कोरोना तालुक्यात पोहचला आहे. शुक्रवारी (दि १५) साकोरे गावात मुंबईवरून पती-पत्नी आले होते. सदर पुरुषाचा मेहुना कोरोना पॉझिटिव आला होता. त्याच्या संपर्कात हा पुरुष आला होता. साकोरे गावात आल्यानंतर गावाच्या बाहेर असलेल्या वस्तीवर त्यांनी स्वतःला कोरोनटाईन केले होते. यातील 38 वर्षीय पुरुषाला लक्षणे दिसू लागली. प्रशासनाला ही माहिती समजताच त्यांनी शनिवारी पती-पत्नीला तपासणीसाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवले .रात्री या दोघांचे तपासणी अहवाल मिळाले असून 38 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाला आहे .त्याची पत्नी निगेटिव निघाली आहे .या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.प्रांत जितेंद्र डूडी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे ,तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे आदींनी साकोरे गावात जाऊन पाहणी केली आहे .प्रशासनाने साकोरे गावच्या सीमा सील केल्या आहेत. गावात बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे .एक किलोमीटर पर्यंतचा परिसर सील केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सदरची व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर गावाच्या बाहेर राहण्यास होतीे. तिचा संपर्क इतरांशी फारसा आला नसला तरी घरातील 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोणाचा फैलाव होत असताना त्याला आंबेगाव तालुका अपवाद ठरला होता .मात्र आता कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे.मुंबईवरून येणारे नागरिक सर्रास कुठेही फिरताना आढळत आहे .त्यांना प्रशासनाने कोरोनटाईन करावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
................ साकोरे गावात आम्ही यापूर्वी काटेकोरपणे कोरोणा येऊ नये म्हणून काळजी घेतली होती. मुंबईवरून आलेल्या व्यक्तीमुळे कोरोना गावात आला.सध्या गावात फवारणीचे काम हाती घेतले आहे .शिक्षक घरोघर जाऊन सर्वे करत आहेत. वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील दहा जणांची कोरोनाची टेस्ट करण्यात यावी.विनोद मोढवे, सरपंच साकोरे