Corona virus : बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण ; रुग्णांची संख्या पोहचली ३५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:55 PM2020-07-04T19:55:10+5:302020-07-04T19:56:14+5:30
बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे.
बारामती : बारामती शहर,तालुक्यात एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहर व तालुक्यात प्रथमच एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्णआढळले आहेत.त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अशोकनगर येथील एका वकिलांच्या पत्नीसह शहरातील ज्येष्ठ नगरसेवकांचा मुलाचा देखील या रुग्णांमध्ये समावेश आहे.
तीन दिवसांपुर्वी शहरातील संगणक अभियंत्याला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्या अभियंत्याच्या काटेवाडी(ता.बारामती) येथील ५४वर्षीय मित्राला कोरोना संसर्ग झाल्याचे मिळालेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. शिवाय सावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे शाखेत कार्यरत असलेल्या ३० वर्षीय कर्मचाऱ्यासह तांबेनगरमधील २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिव्ह आला आहे.त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकाचा ३४ वर्षीय मुलगा,ज्येष्ठ वकीलाची ६७ वर्षीय पत्नीसह एकुण सहा जणांना कोरोना संसर्गझाला आहे.
शहर कोरोनामुक्त झाल्याने बारामतीकर निश्चिंत होते. शहरात व्यापारपेठ, दैनंदिन व्यवहार देखील सुरळीत सुरु होते. नागरीकांनी कोरोनावर मात केल्याचे मानले जात होते.मात्र, आज एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित निघाल्याने हा समज खोटा ठरला आहे. आज सापडलेल्या रुग्णांच्या रुपाने शहरातील उच्चभ्रु वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बैठक घेत शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला तातडीने कोरोना केअर सेंटर करुन येथील सर्व कामकाज एमआयडीसीतील महिला रुग्णालयातून करण्याचे निर्देश दिले.तसेच याबाबत पवार यांनी आरोग्य विभागास आदेश दिले आहेत.लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझर्सचा वापर करावा,अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरु नये, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी आज बारामतीतील बैठकीत केले आहे.
———————————
...शहरातील व्यवहारांवर पुन्हा निर्बंध
बारामतीत एकाच दिवशी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामतीच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणले जाणार आहेत. प्रशासनाने यापुर्वी शहरातील व्यवहार सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरुठेवण्याचे आदेश दिले होते.त्यामध्ये बदल करीत हे व्यवहार आता सकाळी ९ तेसायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
———————————————————