पुणे : ससून रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित असलेल्या तीन महिलांसह चौघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही रुग्णांना अन्य आजारांनीही ग्रासले होते. या चार मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३८ वर पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनासह लोकांची चिंताही वाढत चालली आहे.ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर १० रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. चार मृतांमध्ये पर्वती दर्शन येथील एक २७ वर्षीय तरूण आहे. त्याला १२ एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मद्यपानामुळे त्याचे यकृतचा आजार होता. तीन महिलांपैकी दोन कोंढव्यातील आहेत. एक ५० वर्षीय महिला असून तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दुसऱ्या ४२ वर्षीय महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह व अस्थमा होता. घोरपडी गावातील ७७ वर्षीय महिला २ एप्रिलला ससूनमध्ये दाखल झाली होती. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच मुत्रपिंडाचाही आजार होता. या चार मृत्यूमुळे ससूनमधील एकुण मृत्यूचा आकडा २९ वर पोहचला आहे. जिल्ह्यातील एकुण ३८ मृत्यूपैकी पिंपरी चिंचवड, बारामती, अहमदनगर व ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उर्वरीत ३४ मृत्यू पुणे शहरातील आहेत.-----------
Corona virus : ससूनमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू;जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३८ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 4:39 PM
ससून रुग्णालयामध्ये सोमवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.
ठळक मुद्दे३८ मृत्यूपैकी पिंपरी चिंचवड, बारामती, अहमदनगर व ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश