पुणे : कोरोनाबाधितांवर उपचार करताना काही खासगी हॉस्पिटल लाखो रूपयांची बिले वसुल करीत आहेत़ परंतु, खासगी हॉस्पिटलकडून होणाऱ्या या ‘आजारापेक्षा उपचारच भयंकर’ परिस्थितीत, शहरातील १७ खासगी हॉस्पिटल प्रशासनाला मोफत उपचार देणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत’ पुणे शहरातील तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील १७ खाजगी हॉस्पिटलमध्ये पुर्णपणे मोफत उपचार शक्य असून, आत्तापर्यंत २ हजाराहून अधिक कोरोनाबाधित या हॉस्पिटलमधून उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एकूण ६८ हॉस्पिटलमध्ये सदर जन आरोग्य योजना लागू असून, सर्व स्तरातील कोरोनाबाधित रूग्णांवर येथे मोफत उपचार करणे नियमानुसार बंधनकारक आहे. पुणे शहरात व पिंपरी चिंचवडमध्ये या ६८ हॉस्पिटलपैकी १७ हॉस्पिटल असून, यामध्ये केवळ आधारकार्ड व तत्सम पुरावे देऊन गरीब, श्रीमंत व अतिश्रीमंत कोरोनाबाधितही मोफत उपचार घेऊ शकतात. सदर हॉस्पिटलला उपलब्ध बेडस् (खाटांच्या) क्षमतेच्या २५ टक्के बेडस् या योजनेतील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. तसेच दिल्या जाणाºया वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्यय चाचण्या आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि १० दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचारही समाविष्ट आहेत.
शहरातील या १७ हॉस्पिटलमध्ये भारती हॉस्पिटल (कात्रज), केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल (वाघोली), देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (कोथरूड), गॅलक्सी केर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा़लि़ (डेक्कन), ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (दत्तवाडी), एच़व्ही़देसाई हॉस्पिटल (हडपसर), लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), ओम हॉस्पिटल (भोसरी), सुर्या हॉस्पिटल (पुणे), डी़वाय़पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (पिंपरी), एम्स हॉस्पिटल (औंध), देसाई अॅक्सिडंट अॅण्ड जनरल हॉस्पिटल (भोसरी), लाईफलाईन हॉस्पिटल (भोसरी), पवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड डायगनॉस्टिक सेंटर (बिबवेवाडी), राव नर्सिंग होम बिबवेवाडी (बिबवेवाडी), रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटल (येरवडा), श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर अॅण्ड ट्रॉमा सेंटर (खराडी), इंटरग्रेटेड कॅन्सर सेंटर (केसनंद) व दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (कोथरूड पुणे) या १७ खाजगी हॉस्पिटलचा समावेश आहे.
तर याच योजनेत आठ हॉस्पिटलमध्ये जिल्हा रूग्णालय (औंध), लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (पिंपरी), ससून हॉस्पिटल (पुणे स्टेशन), वायसीएम (पिंपरी), कमला नेहरू हॉस्पिटल (पुणे), नायडू हॉस्पिटल (पुणे), विभागीय मेंटल हॉस्पिटल (येरवडा) ही सरकारी आहेत.
-----------------------------