पुणे : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीवर मात करण्यासाठी समाजातील विविध स्तरातून अनेकजण मदतीचे हात पुढे करत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पीएम केअर्स फंडमध्ये मदत दिली. परंतु पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेचं दातृत्व सगळ्यांसमोर सरस ठरेल असंच आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या महिलेने त्यांनी 15 हजार रुपयांची मदत केली आहे.गवळणबाई मुरलीधर उजगरे असे त्या महिलेचे नाव आहे. या गेल्या 20 वर्षांपासून कचरा गोळा करतात. यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. महिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी देऊन टाकले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कराळेकर व छावाप्रमुख धनंजय जाधव यांच्या माध्यमातून Online मुख्यमंत्री फंडात ५००० रुपये आणि माता जिजाऊ प्रतिष्ठान ५००० रुपये जीवनज्योती प्रतिष्ठान ५००० रुपये दोन सेवाभावी संस्थांना एकूण 15 हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे. जाधव यांनी उजगरे यांचे पैसे आँनलाइन पाठविण्यासाठी मदत केली. "माझं वय साठ वर्षांच्या वर आहे. पण असं संकट कधी पाहिलं नव्हतं," असं त्या म्हणाल्या. यावेळी देशासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. -----------------------------------जगलो तर अजून कमवता येईल....
"आपण जगलो तर पुढे अजून कमावता येईल, पण आता लोकांना मदत होणं गरजेचं आहे," असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या या संकटातही त्या कचरा वेचण्याचं काम करतच आहेत. "धोका आहे म्हणून जर सगळेच घरात बसले तर कम कसं होणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला.--------------------------------------गृहमंत्री देशमुख यांनी मानले आभार गवळणबाई उजगरे विश्रांतवाडी / धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. अशा परिस्थितीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विश्रांतवाडी येथील स्वच्छता सेवक मावशींचे Twitte करून आभार मानले आहेत.--------------