पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी आजवरची सर्वाधिक १ हजार ४५१ रूग्णांची भर पडली असून यामध्ये रॅपिड अँटिजेन किटद्वारे निष्पन्न झालेल्या ४५१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३० हजार ५२३ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ७४६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ५०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
बुधवारी रात्री साडे दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९६५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात २६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ७२५ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१४ रुग्ण दाखल झाले आहेत. तर, पालिकेच्या विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणीत निष्पन्न झालेले ४५१ रुग्ण असे एकूण १४१६ रुग्ण वाढले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४२६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
दिवसभरात १५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८८९ झाली आहे. दिवसभरात एकूण ७४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ५३१ रुग्ण, ससूनमधील २० तर खासगी रुग्णालयांमधील १९५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १९ हजार ५७० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १० हजार ६४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार १५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ७८ हजार ११५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे २ हजार ३२८ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. दोन्ही मिळून एकाच दिवसात ६ हजार ३४३ जणांची तपासणी दिवसभरात करण्यात आली आहे.