नीलेश राऊत-
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर शाश्वत उपाय नसल्याने, कोरोनाची बाधा झाल्यावर वैद्यकीय उपचाराचा खर्च भागविण्यासाठी, अनेक विमा कंपन्या नागरिकांना ‘आरोग्य विमा’ (मेडिक्लेम) काढण्यासाठी नागरिकांना गळ घालत आहेत. पण त्याचवेळी बहुतांशी विमा कंपन्यांनी ठरवून दिलेल्या रूग्णालयेही आता नागरिकांची ‘आरोग्य विमा’ काढण्यापूर्वीची वैद्यकीय तपासणी करण्यास तयार होत नसल्याचे आढळून आले आहे.संबंधिताला कोरोनाची बाधा तर नाही ना या धास्तीने बहुतांशी रूग्णालये विमा उतरवू पाहणाºया व्यक्तीस विविध कारणे देऊन टाळत आहे.
‘आरोग्य विमा’ (आजारानंतरच्या रूग्णालयातील उपचार खर्चाचा) उतरविला तर, यदाकदाचित कोरोनाची बाधा भविष्यात झाल्यास खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारावर येणाऱ्या खर्चाचा भार पडणार नाही.याकरिता अनेक जण आपला ‘आरोग्य विमा’ काढण्यासाठी सरसारवले आहेत. पण कोरोनाच्या या संकटात अनेक खाजगी रूग्णालये सामान्य रूग्णास की ज्यास कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत, त्यांनाही कोरोनाची चाचणी करण्याचा आग्रह प्रारंभी करीत असल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे. अशातच ४० वर्षापुढील वयांच्या व्यक्तीला आरोग्य विमा काढण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करणे बहुतांशी विमा कंपन्यांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीस विमा कंपन्यांनी आपल्या पॅनेलवर (अधिकृत रूग्णालये) नियुक्त केलेल्या रूग्णालयाकडून वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात येते. परंतु, ‘आरोग्य विमा’ काढणाºया व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यास आजमितीला त्यांच्याकडूनही नकार दिला जात आहे.
ही वैद्यकीय तपासणी करताना रक्तदाब मधुमेहाचा त्रास आहे का, अन्य काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत का याची सहानिशा करतानाच, काही एक्स-रे ही काढण्यास सांगण्यात येतात.तसेच ५० वर्षापुढील व्यक्तींना डोळयांची तपासणीही बंधनकारक आहे. अशावेळी ही तपासणी करण्यासाठी रूग्णालयात गेल्यास, डॉक्टर उपलब्ध नाहीत, एक्स-रे मशिन खराब आहे आदी कारणे देऊन विमा काढू इच्छिणाºया व्यक्तीला कोरोच्या भितीमुळे टाळले जात आहे.यामुळे विमा उतरविण्यासाठी गळ घालणारे विमा एजंट तसेच आरोग्य विमा काढू इच्छिणारे नागरिकही त्रस्त झाले आहेत.
-------------------------
विमा प्रतिनिधींचे होतेय मरण
विविध विमा कंपन्याचे विमा प्रतिनिधी या लॉकडाऊनच्या काळात आपल्या परिचितांना आरोग्य विमा काढण्यासाठी राजी करतात.परंतु, हा विमा उतरविताना वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्य अडचणींमुळे विमा प्रतिनिधीही त्रासले असून, कंपनीने दिलेले ध्येय गाठताना मात्र त्यांचे मधल्या मध्ये मरण होत आहे़
---------------
विमा काढला म्हणजे लगेच फायदा नाही
कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी वैद्यकीय खर्चाचा भार येऊ नये म्हणून आरोग्य विमा काढण्यासाठी भर दिला आहे. परंतु, आरोग्य विमा काढला म्हणजे लागलीच तो लागू होत नाही. अपघात वगळता अन्य आजारांसाठी तो एक महिन्यानंतर कार्यरत होतो याचा अनेकांना विसर पडला आहे. त्यामुळे आरोग्य विमा उतरविताना ही काळजी अथवा त्याचे नियम बारकाईने पाहूनच तो काढावा असे एका विमा प्रतिनिधीने सांगितले.
---------------