पुणे : शहरातील कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता खासगी रुग्णवाहिका सहजासहजी उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. कोरोनासदृश लक्षणे म्हणजे सर्दी, ताप, खोकला असेल तर किंवा नायडू, ससूनला जायचे असेल तर थेट नकार मिळत आहे. रुग्णवाहिका चालविण्यास चालकही नकार देत असल्याचे रुग्णवाहिका मालकच मान्य करत आहेत. तसेच अनेक चालकांकडून सुरक्षा कीटची मागणी केली जात असल्याने मालकांनीही हात टेकले आहेत.पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुमारे २०० च्या जवळपास खासगी रुग्णवाहिका आहेत. तसेच रुग्णालयांच्या रुग्णवाहिकाही उपलब्ध आहेत. पण सध्या कोरोना संकटामुळे सहजासहजी रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. शासनाची सेवा असलेल्या १०८ ही रुग्णवाहिकाही वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पण रुग्णवाहिकांना चालक उपलब्ध होत नसल्याने उभ्या आहेत. रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठीही अनेकांच्या हातापाया पडावे लागत आहे. याविषयी बोलताना पुणे जिल्हा अॅम्ब्युलन्स असोसिएशनचे अध्यक्ष हम्पलिंग भद्रे म्हणाले, कोरोनामुळे अनेक चालक आपल्या गावी निघून गेले आहेत. इथे असलेले चालकही सहजपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच रुग्णालयात जाण्यासाठी फोन आला तरी आधी त्यांच्याकडे आजाराबाबत विचारणा केली जाते. सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे असतील तर रुग्णवाहिका जात नाही. त्यांना १०८ ला फोन करायला सांगितले जाते. इतर ससून किंवा नायडूला जायचे असेल तरीही चालक नकार देतात. त्यांच्याकडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जातो.ह्यखासगी रुग्णवाहिकांच्या चालकांना सुरक्षा कीट देण्यासंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी महिनाभरापुर्वी चर्चा केली आहे. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. बाहेरगावी गेलेले चालक परत येऊ इच्छितात. पण त्यांना पोलिसांकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे काहीवेळा रुग्णवाहिका उपलब्ध करून देता येत नाही. रुग्ण अत्यवस्थ असेल तर काही चालक तयारी दाखवितात. संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे माहित नसते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे चालकांना सुरक्षा कीट मिळाल्यास रुग्णांना सहजपणे रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकते, असे असोसिएशनचे सचिव गोपाळ जांभे यांनी सांगितले.----------------सध्या रुग्णवाहिकांना मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णवाहिकांनाही सोबत घ्यायला हवे. चालकांना सुरक्षा कीट उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविणे शक्य होईल. तसेच पोलिस परवानगीचे नियमही शिथील करायला हवेत.- गोपाळ जांभे, सचिव, पुणे जिल्हा अॅम्ब्युलन्स असोसिएशन---------------असोसिएशनच्या मागण्या -- चालकांना सुरक्षा कीट मिळावे- पोलिस परवानगीचे नियम शिथील करावेत- रुग्णवाहिका धुवण्याची सोय करावी- प्रशासनाने खासगी रुग्णवाहिकांनाही सोबत घ्यावे----------
Corona virus : नायडू, ससूनला जायचंय...सॉरी! खासगी रुग्णवाहिका मिळणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 5:49 PM
कोरोनासदृश लक्षणे म्हणजे सर्दी, ताप, खोकला असेल तर किंवा नायडू, ससूनला जायचे असेल तर अनेक चालकांकडून थेट नकार
ठळक मुद्देपुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुमारे २०० च्या जवळपास खासगी रुग्णवाहिका