Corona virus : पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या मागणीत पाच पटीने वाढ : सौरभ राव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:07 PM2020-08-26T20:07:46+5:302020-08-26T20:09:31+5:30
कृत्रिम टंचाई व दर वाढ केल्यास गुन्हे दाखल करू
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. यामुळेच व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड्सच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळेच पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या मागणीत दोन महिन्यात तब्बल पाच पटीने वाढ झाली आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होत असून, पुरवठादारांनी कृत्रिम टंचाई व दर वाढ केल्यास कायदेशीर कारवाई करत थेट गुन्हे दाखल करू असा इशार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून अनेक हाॅस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याबाबत पवार यांनी नक्की काय अडचण आहे ते पाहून त्वरीत पुरवठा नियमित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार , विभागीय आयुक्त यांनी राव यांनी बैठक घेऊन आठावा घेतला. याबाबत राव यांनी सांगितले, पुणे जिल्ह्यात जुन महिन्यात कोरोना रूग्णांसाठी प्रति दिन केवळ 40 मे.टन ऑक्सिजनची मागणी होती. यामध्ये ऑगस्ट मध्ये तब्बल पाच पट्टीने वाढ झाली असून, आज दररोज सरासरी 110 मे.टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोन्ही जम्बो हाॅस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ही मागणी 125 मे.टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे.
पुणे जिल्ह्यात चाकण, जेजुरी या दोन्ही एमआयडीसीमध्ये काही कंपन्यांमध्ये ऑक्सिजन तयार केला जातो. सध्या दिवसाला सरासरी 135 मे.टन ऑक्सिजन उत्पादन केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना जास्तीत जास्त कमला मर्यादेनुसार उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होत असून, पुरवठादारांनी कृत्रिम टंचाई व दर वाढ केल्यास कायदेशीर कारवाई करत थेट गुन्हे दाखल करू असा इशार विभागीय राव यांनी दिला आहे.