Corona virus : बारामतीकरांचं टेन्शन वाढलं; एकाच दिवसांत सापडले ८० कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:10 PM2021-03-09T13:10:53+5:302021-03-09T13:12:29+5:30
अडीच महिन्यात प्रथमच उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले.
बारामती: दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने नागरिकांनी चांगलेच धास्ती घेतली आहे. आज एका दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यात ८९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. गेल्या अडीच महिन्यात कोरोना रुग्ण आकडेवारी नियंत्रणात होती.मात्र आता १८ फेब्रुवारीपासुन रूग्ण वाढीस सुरवात झाली आहे. त्यानंतर आता कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.प्रशासनाने उपाययोजना आणि दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील ५६ आणि ग्रामीणतधील २६ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच आज उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ७२१४वर पोहोचली आहे. तर ६६३८ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४७ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अधिकारी रस्त्यांवर उतरले आहेत .आज एकाच कुटुंबात ११ रुग्ण सापडले आहेत , तर एकाच इमारतीत ९ रुग्ण सापडले आहेत. पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक चौकात कारवाई सुरू केली आहे आता विनामास्क फिरणाऱ्या महाभागांकडुन ५०० रुपये दंड आकारण्यास सुरवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने मास्क शिवाय दुकानात प्रवेश करू नये, असे फलक शहरातील प्रत्येक दुकानावर लावले आहेत. मात्र, दुकानांमध्ये येणाऱ्या काही उदासिन नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही.दुकानदार देखील त्याकडे दुर्लक्षच करत आहेत .तो फलक नामधारी ठरल्याचे वास्तव आहे . आगामी काळात उदासीन कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याने नागरिकांवर प्रशासन निर्बंध लादणार का , याची नागरिकांना आता चिंता सतावत आहे .
—————————————