इंदापूर : इंदापूर शहर व तालुक्यात सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन होणार असल्याकारणाने, इंदापूर शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तालुक्यातील अनेक गावातील हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी इंदापूर शहरात सोमवारी (दि.९ ) रोजी दिवाळीच्या खरेदीसारखी गर्दी केलेली दिसून आली.
इंदापूर शहारातील बाजार पेठ काल सोमवारी प्रचंड गजबजलेले दिसून आली. विविध व्यावसायिकांसोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, ग्राहकांनी प्रचंड गजबजून गेली होती. मात्र यावेळी कोविड प्रतिबंधक नियमांचे नागरिकांनी पालन केले नाही. त्यामुळे या गर्दीचा परिणाम येणाऱ्या पाच दिवसांत संपूर्ण तालुक्याला भोगावे लागणार आहेत.
इंदापूर बाजार पेठेत नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळलेले दिसून आले नाही. तालुक्यातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती की, कोरोनाचे संकट आहे का नाही असेच चित्र बाजारपेठेत सोमवारी दिसून आले.
इंदापूर तालुक्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या घरात पुरेसा अन्नधान्य, मसाले आदींचा साठा करून घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. गर्दी एवढी प्रचंड होती की बाजारपेठेत अनेकवेळा वाहतूक जाम झालेले देखील दिसून आले. असे दृश्य असताना प्रशासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची दिसून आले.
बाजारपेठेत अनेक नागरिकांनी मास्क लावले नव्हते तर कोणीही फिजिकल डिस्टंन्सिंग पाळले नाही. सॅनिटायझर वापरताना दिसले नाहीत. मागील दोन दिवसात स्वाब टेस्ट दिलेले अनेक रुग्ण बाजारात फिरताना दिसले. नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र, प्रशासनाने सायरन वाजविण्याशिवाय कोणतीही उपाययोजना केलेली दिसून आले नाही.
____________ पुढील ४ ते ५ दिवसांत याच गर्दीचे रूपांतर कोरोनाबाधितांमध्ये होण्याची भीती....
इंदापूर शहरात एवढ्या मोठया संख्येने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांना खरेदी करताना इंदापूर तालुक्यात रोज ३०० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे याचे भानच राहिले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या चार पाच दिवसांत तालुक्यात कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.