Corona Virus : कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात 'जम्बो' बैठक; शरद पवार व प्रकाश जावडेकरांनी अधिकाऱ्यांना दिला 'कानमंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:03 PM2020-09-05T19:03:11+5:302020-09-05T19:24:46+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांचा देखील सहभाग तितकाच महत्वाचा आहे.
पुणे: पुण्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कडक उपाययोजनांसह काही ठोस पावले टाकणे गरजेचे आहे. त्यात शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तात्काळ शोध,कोरोना विषाणू संबंधी जनजागृती यांसारख्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत नागरिकांचा सहभाग देखील तितकाच आवश्यक असणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुण्यातील विधानभवनात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.5) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हजर होते.
पवार म्हणाले, कोरोनाचा एवढा फैलाव होत असताना देखील पुण्यातल्या नागरिकांना अद्यापही गांभीर्य आलेले नाही. ते स्वतः सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करत रस्त्यांवर विनामास्क फिरत आहे.ही चिंतेची बाब आहे.अशा व्यक्तींवर प्रशासनाने कडक कारवाई करावी. सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी आरोग्य तपासणी बंधनकारक करावी.त्याचप्रमाणे बांधकाम पूर्ण इमारतींचा देखील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विचार करण्यात यावा असेही पवार यांनी या बैठकीत सांगितले.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचा दर हा देशात सर्वाधिक आहे. पुण्यातील हा रुग्णदर आणि रुग्णवाढीचा वेग आटोक्यात आणायला हवा. तसेच ज्या भागात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे जास्तीत जास्त तपासणी चाचण्या, सर्वेक्षण आणि उपाययोजना कराव्यात. प्रतिबंधित क्षेत्रात जनजागृती वर जास्त भर दिले पाहिजे. त्याचप्रमाणे शहरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे देखील प्रभावीपणे व्यवस्था निर्माण करून जास्तीत जास्त रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध होईल हे पाहावे.