पुणे (नसरापूर) : कोरोना’च्या संकटामुळे खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित केली असून याकरीता टोलवरील दोन मार्गिका खुल्या केल्या असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे.त्यामुळे कमीतकमी यंत्रणेवर टोल वरील कामकाज सुरू राहणार असल्याचे चिटणीस यांनी सांगितले.
शासनाच्या तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत यासाठी टोलवसुली रद्द करण्यात आली असल्याचे समजते. रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे असे पश्चिम विभागाचे रिजनल हेड अमित भाटिया यांनी सांगितले.
खेड शिवापूर येथील टोलनाक्यावरील वाहनांसाठी दोन मार्गिका खुल्या केल्या असून टोल नाक्यावरील वसूली तात्पुरती बंद केलेली आहे.मात्र हा टोल नाका बंद केलेला नाही असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.