लोणी काळभोर : अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश प्राप्त झाले असल्याने शिक्षक द्विधा मनस्थितीत सापडले आहे. हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाने एकावेळी एकाच ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन हवेली तहसीलदार व पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
याबाबत हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर म्हणाले, शिक्षकांना कोविड प्रतिबंधासाठी गाव सर्वेक्षण, रेशन धान्य वाटप, कोविड सेंटर तसेच ऑनलाईन शिक्षण आदी अनेक कामे करण्याचे आदेश देेेण्यात आले आहेत. यामुळे एकाच वेळी ही सर्व कामे कशी करावयाची ? हे प्रश्नचिन्ह त्यांना सतावत आहे. वास्तविक पहाता तालुक्यांत अनेक शिक्षण संस्था व महाविद्यालये आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नियमित व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवरच अतिरिक्त कामाची कु-हाड का ?
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिल व पंचायत समिती व आरोग्य कार्यालयांच्या वतीने हा आदेश काढण्यात आले आहेत. परंतू, या सर्व कार्यालयातील अधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकार घडला आहे. प्रत्येक खात्याचे आदेश वेगवेगळे आल्याने शिक्षकांचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
कोरोना महामारीत काम करण्यास ते तयार आहेत. पण एकावेळी एका ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच जे काम आहे त्याचे योग्य प्रशिक्षण व सर्व संरक्षण साहित्य मिळावे व सर्वाना समान काम दयावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
काही प्राथमिक शिक्षकांना एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश देण्यात आलेची माहिती दोन दिवसांपूर्वी समजली असून ही बाब योग्य नाही. गरजेप्रमाणे पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. दिलेले आदेशांची तपासणी करून दुबार नावे होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे संबंधित अधिकारी यांना सांगण्यात आले आहे. सुनील कोळी - तहसिलदार, हवेली तालुका