पुणे : जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांच्या सुश्रुषेसाठी नेमलेल्या ‘लाईफलाईन’ कंपनीकडील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी यंत्रणांची पळापळ सुरु झाली आहे. येथील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता महापालिकेकडून तात्काळ 50 डॉक्टस आणि 150 वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
जम्बोमध्ये होत असलेले रुग्णांचे मृत्यू, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्तांसह पालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी जम्बोमध्ये तळ ठोकून आहेत. जम्बोमधील समस्यांचा सर्वंकष आढावा घेऊन उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात येथील व्यवस्था सुरळीत होतील असे अधिका-यांनी सांगितले. एकंदरीतच शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरील ‘प्रेशर’ वाढत असल्याने यंत्रणा सुधारण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. लाईफलाईन कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पालिकेने याठिकाणी 50 डॉक्टर आणि 150 वैद्यकीय मनुष्यबळ पुरविले आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्या सुश्रुषेसाठी अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.====यंत्रणांमधील समन्वयासाठी समितीविभागीय आयुक्तालय, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जम्बोसंबंधी समन्वयाचा अभाव आहे. या यंत्रणांमध्ये समन्वय घडविण्यासाठी समन्वय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. समन्वयाअभावी निर्माण होत असलेल्या समस्या दूर करणे आणि चांगली वैद्यकीय सुविधा पुरविली जाण्यासाठी ही समिती काम करणार आहे. समन्वयाचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे.====जम्बो कोविड रुग्णालयातील एकंदरीत कामकाज, सुविधा आणि वैद्यकीय उपचार यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अतिरीक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी जम्बोच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवणार असून येथील त्रुटी दूर करुन सुरळीत काम सुरु राहील यावर हे अधिकारी काम करणार आहेत. ====जम्बोमधील व्यवस्था दोन दिवसात सुरळीत होईल. जम्बोसाठी 50 डॉक्टर आणि 150 वैद्यकीय कर्मचारी पुरवित आहोत. यंत्रणांमधील समन्वयासाठी कार्यकारी समिती नेमण्यात आली आहे. यासोबतच अतिरीक्त जिल्हाधिकारी दर्जाचे चार अधिकारी नेमण्यात आले आहेत. जम्बोसाठी पालिकेने पहिल्या दिवशीच 15 दिवस पुरेल एवढी औषधे दिली आहेत. कोणत्या तारखेला किती औषधे दिली याचीही यादी आम्ही देऊ शकतो. जम्बोकडून आलेल्या प्रत्येक मागणीनुसार पुरवठा केलेला आहे. व्हायरल झालेली आॅडिओ क्लिप कदाचित जुनी असू शकते. या आॅडिओ क्लिपबाबत लाईफलाईनकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. - रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त, पुणे महापालिका