पुणे : आजपर्यंत प्रशासन व पालकमंत्र्यांनी लॉकडाऊनसह जे काही निर्णय घेतले त्याला सर्व राजकीय पक्ष व नागरिकांनी सहकार्य केले. परंतु, सतत लॉकडाऊन जाहीर करणे बरोबर ठरणार नाही. लॉकडाऊन वाढवणे हा कोरोनावरचा एकमेव पर्याय किंवा उपाय होऊ शकत नाही, अशा शब्दात पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर भाष्य केले.
भाजप खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दुधाच्या पिशव्या देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिलिटर 10 रूपये जमा करावे व प्रतिकिलो दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 50 रुपये द्यावे अशी मागणी केली.यावेळी बापट बोलत होते.
बापट म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊन जाहीर केल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, लॉकडाउनच्या काळातच रुग्णसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांना सुलभ सुविधा व योग्य उपचार देण्यात राज्य सरकार कमी पडत आहे. आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रशासन व राज्य सरकारने अन्य महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे सांगत महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडला.