पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापन आता ‘मेडब्रो’ या कंपनीकडे दिले जाणार आहे. ही कंपनी पिंपरी-चिंचवडच्या मगर स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचे काम पाहत आहे. ही कंपनी पुण्यातीलच असून मंगळवार रात्रीपासून व्यवस्थापनाचे काम त्यांना हस्तांतरीत केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणा आणि अव्यवस्थेला कारणीभूत ठरलेल्या 'लाईफलाईन' या संस्थेकडून काम काढून घेण्यात आले आहे. 800 खाटांचे जम्बो रुग्णालय कमी मनुष्यबळात चालवित नफेखोरी करण्याचा प्रयत्न या संस्थेकडून करण्यात आला. डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये अत्यंत सुमार काम केलेल्या लाईफलाईनला मनुष्यबळाच्या भरतीकरिता आठ दिवसांचा अवधी देण्यात आलेला होता. रुग्णांवर वेळेत उपचार न होणे, अत्यवस्थ रुग्णांकडे गांभीर्याने न पाहणे आदी बाबींमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. प्रशासकीय दुर्लक्ष आणि एजन्सीचा हलगर्जीपणा यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले.यावरुन सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासन आणि शासन स्तरावर नवीन एजन्सी नेमण्याचे आदेश देण्यात आले. पालिकेने या एजन्सीला पुरेशा प्रमाणात औषधे पुरविली होती. यासोबतच आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. परंतू, या कंपनीकडून अपेक्षित असे काम झाले नाही. लाईफलाईनचा बेजबाबदारपणा उघडा झाल्यावर त्यांनी पालिकेवर आरोप केले. पालिकेकडून औषधे मिळत नाहीत आणि अन्य तक्रारी केल्या. याशिवाय राजकीय हस्तक्षेप असल्याचाही आरोप करीत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केल्याचे विक्रम कुमार म्हणाले.लाईफलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यांनी शासकीय यंत्रणांची फसवणूक केली. डॉक्टर आज येतील-उद्या येतील, गाडीमध्ये बसले आहेत, आज एवढे मनुष्यबळ जॉईन होईल अशी आश्वासने लाईफलाईनकडून दिली जात होती. परंतू, प्रत्यक्षात ते संधी देऊनही मनुष्यबळ उपलब्ध करु शकले नाहीत. डॉक्टरांना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर पालिकेवर आरोप केल्याचे कुमार यांनी सांगितले.=====जम्बो कोविड सेंटरचे काम पिंपरी चिंचवडच्या जम्बो सेंटरमध्ये व्यवस्थापन पहात असलेल्या 'मेडब्रो' या एजन्सीला देण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला पालिकेचे मनुष्यबळ देण्यात आलेले आहे. मंगळवार रात्रीपासून ही एजन्सी व्यवस्थापन सांभाळणार आहे. दाखल रुग्णांची देखभाल चांगल्याप्रकारे केली जात आहे.- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
Corona virus : पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापन आता ‘मेडब्रो’ कंपनीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 12:30 PM
पिंपरी-चिंचवडच्या जम्बो हॉस्पिटलमध्ये करताहेत काम
ठळक मुद्देमहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती