Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:19 PM2021-04-02T16:19:45+5:302021-04-02T16:20:15+5:30

Coronavirus Mini Lockdown in Pune: जाणून घ्या काय आहे नियमावली, काय बंद अन् काय सुरू?

Corona Virus Mini Lockdown : Ajit Pawar also bowed before the administration; Mini lockdown announced in Pune | Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा

Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा

Next
ठळक मुद्देसायं. ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.  पीएमपी बससेवा बंद राहणार आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

विभागीय आयुक्तसौरभ राव म्हणाले,  लोकांना त्रास होऊ नये म्हणून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक केले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ॲाडिट पुन्हा सुरू केले जाईल. पॅाझिटिव्हिटी २७% वरून ३२% वर गेला आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला ९ हजार रुग्ण सापडतील. हॉस्पिटल बेडसंदर्भात काल बैठक झाली. काही रुग्णालये १००% कोविड हॅास्पिटल करण्याची वेळ येऊ शकते.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, चेक पोस्ट, पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधीप्रमाणेच सुरू राहणार असून  शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी ६ पर्यंत अन्नपदार्थ मिळतील, पण त्यानंतर ॲपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे. 

लसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले, पुण्यात सर्वात जास्त लसीकरण सुरू आहे. शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज सुरू करण्यात येणार आहे. 

मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.

निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊनच लादल्याने नागरिकांत प्रचंड संताप
पुण्यामध्ये निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊनच लावल्याने प्रचंड संताप व्यक्त हाेत आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्याचे कारणच काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सहा वाजल्यापासून संचारबंदीमुळे राेजंदारीवर काम करणाऱ्यांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. त्यांना कामच करणे शक्य हाेणार नाही. हाॅटेलची वेळही सहा वाजेपर्यंतच केल्याने या उद्याेगावर विपरीत परिणाम हाेणार आहे. त्याचबराेबर नागरिकांनाही त्रास हाेणार आहे. एकटे राहणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. 
पुण्यातील पीएमपी सेवा बंद करण्यासही विराेध केला आहे. भारतीय जनता पक्षानेही या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे आणि  परिसरातून हजाराे कामगार दरराेज पीएमपी बसने प्रवास करून कामाच्या ठिकाणी जातात. त्यांना पाेहाेचता येणार नसल्याने उद्याेगचक्रावर परिणाम हाेणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.  संचारबंदी नको तर जमावबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली. 

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
मेडिकल दुकाने, दूध, भाजीपाला या अत्यावश्यक सेवांसह वृत्तपत्र सेवा सुरू राहणार आहे. औद्याेगिक आस्थापना, कार्यालयांवर काेणतेही निर्बंध नाहीत. कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट कायम आहे. किराणा मालाची दुकाने मात्र सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, असे साैरभ राव यांनी स्पष्ट केले. 

कामावरून परतणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत
सायंकाळी सहानंतर संचारबंदी असली तरी कामावरून परतणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत. कारण बहुतांश कार्यालये सायंकाळी सहानंतरच बंद होतात, असे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. 

मिनी लाॅकडाऊनचे नियम
* अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गाेष्टी बंद
* दिवसा जमावबंदी. रात्री संचारबंदी, सर्व धार्मिक स्थळे बंद, उद्याने सकाळी सुरू राहणार
* लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद
* हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील ७ दिवसांसाठी बंद, होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
* पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांसाठी बंद
*  लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक लोक चालणार नाही, अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी
* सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू, आठवडा बाजार सात दिवस बंद
*  शनिवारपासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणार 
*  शाळा, कॉलेज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार

.........

पुण्यात मागच्या आठवड्यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. बेडच उपलब्ध झाले नाही तर काय करायचे? एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल तरी घरातील लोक गावभर फिरतात. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. काही हाॅस्पिटल पूर्णपणे काेराेनासाठी ठेवा. नाॅन कोविड हाॅस्पिटलची यादीही  जाहीर करा. आरोग्य यंत्रणेवर, पोलिसांवर ताण असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. 
 - अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Corona Virus Mini Lockdown : Ajit Pawar also bowed before the administration; Mini lockdown announced in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.