पुणे : महाराष्ट्र शासनाच्या २१ मे, २०२० च्या अधिसुचनेनुसार बीलाची रक्कम कमी करण्याचे आदेश देऊनही बील कमी न करणाऱ्या एका खाजगी हॉस्पिटललापुणे महापालिकेने चांगलाच दणका दिला. शासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन केल्याने हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटिसच हॉस्पिटलला पाठविली असता संबंधित हॉस्पिटलने पालिकेने कमी केलेली बीलाची रक्कम संबंधित रूग्णास लागलीच परत केली.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक यांनी, युनिर्व्हसल हॉस्पिटलला अवाजवी बिलाबाबत नोटिस बजावली होती. अखेर कारवाईची नोटिस देताच संबंधित हॉस्पिटलने जादाची रक्कम म्हणजे ४९ हजार ३०० रूपये रूग्णाला नुकतेच परत केले आहेत.
डॉ.नाईक यांनी याबाबत सांगितले की, कोरोना आपत्तीत रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार, महापालिकेने आलेल्या तक्रारींवर थर्ड पार्टी आॅडिट सुरू केले आहे. यात आत्तापर्यंत ४९१ तक्रारीमध्ये जादाचे आढळून आलेले १ कोटी ४९ लाख ६९ हजार ९०९ रूपये कमी करण्यात आले आहे. यादरम्यान युनिर्व्हसल हॉस्पिटलकडून जादा बिल आकारणी केल्याची एक तक्रार रूग्णाच्या नातेवाईकांनी केली होती. या तक्रारीची सहानिशा केली असता, या हॉस्पिटलला राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार बील कमी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्याने शासन अधिसूचनेचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निर्दशनास आणून देऊन, अधिसूचनेतील तरतूदीनुसार हॉस्पिटलचा नर्सिग होम परवाना रद्द करण्याबाबत त्यांना १६ सप्टेंबर रोजी नोटिस बजाविण्यात आली होती.
या नोटिसची संबंधित हॉस्पिटलने गांभीर्याने दखल घेऊन २३ स्पटेंबर रोजी तक्रार केलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांकडे कमी केलेल्या बीलातील रक्कमेचा धनादेश सूपूर्त केला आहे़ त्यामुळे संबंधित हॉस्पिटलवर आता कोणतीही कारवाई होणार नसून, २० टक्के राखीव बेडवर उपचार होणाऱ्या कोविड रूग्णांकडून शासनाच्या नियमाप्रमाणेच बील आकारणी करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले आहे़
--------------------------
शासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून अवाजवी बिले आकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटलबाबत तक्रारी आल्यास त्याचे थर्ड पार्टी आॅडिट महापालिकेकडून करण्यात येत असून, त्यात तथ्य आढळल्यास संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला नोटिस देऊन, बील कमी करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. परंतु काही हॉस्पिटल या सूचनेचे उल्लंघन करीत असल्याचे त्यांच्यावर अशारितीने येथून पुढेही कारवाई करण्यात येणार असून, हॉस्पिटल प्रशासनाने कोरोना आपत्तीच्या काळात शासनाच्या निर्देषानुसारच बिल आकारणी करावे असे आवाहन आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी केले आहे.
-----------------------