पुणे : कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पुणे महापालिकेने शहरातील कोरोना संशयितांच्या रॅपिड टेस्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अँटीजेन किटच्या माध्यमातून या टेस्टचा अहवाल अवघ्या २० ते ३० मिनिटांत प्राप्त होणार आहे.यामुळे प्रयोगशाळेकडून तपासणी अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये एकत्रित ठेवण्यात येणाऱ्या संशयितांपैकी पॉझिटिव्ह रूग्णाकडून होणारा संसर्ग टाळता येणार आहे.
आजमितीला पुणे शहरात साधारणत: तीन हजार संशयितांचे स्वॅब घेण्यात येतात. परंतु, एनआयव्ही या शासकीय प्रयोगशाळेची क्षमता कमी असल्याने हे अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवस वाट पहावी लागत आहे. यामुळे राज्य शासनाच्या सुचनेनुसार, एस.डी. बायोसेन्सर या कंपनीचे ‘अँटीजेन’ हे किट वापरून आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतू सौम्य लक्षणे अथवा लक्षणे नसलेल्यांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लागलीच आज या १ लाख ‘अँटीजेन’ किट खरेदीची आॅर्डर दिली आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
-------------
पालिकेचा एका रूग्णामागे ९ हजार रूपये खर्च
एका कोरोनाबाधित रूग्णाची तपासणी, क्वारंटाईन सेंटरमधील जेवण, नाष्टा, स्वच्छता, औषधे, रूग्णवाहिका असा सर्व मिळून सरासरी पुणे महापालिका एका रूग्णावर ९ हजार रूपये खर्च करते. दररोज ३ हजार संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले तरी, यापैकी १४ टक्के म्हणजेच सुमारे ४०० तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येतात. यापैकी खाजगी प्रयोगशाळांकडील तपासणी वगळता दीड ते दोन हजार संशयितांना दोन ते तीन दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते़ त्यांचा खर्च हा सरासरी प्रत्येकी ४ ते ५ हजार रूपये इतका येतो. त्यामुळे ‘अँटीजेन’ हे किट वापरून तपासणी केल्यामुळे अवघ्या २० मिनिटात तपासणी अहवाल मिळणार असल्याने हा सर्व पैसा वाचविता येणार आहे.
--------------------------------