पुणे : शहरात बुधवारी झालेली कोरोनाबाधितांची वाढ ही या वर्षातील सर्वात उच्चांकी ठरली असून, आज दिवसभरात तब्बल ८५३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
दरम्यान शहरात संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, अनेक जण खाजगी प्रयोगशाळांमधून तपासणी करण्यास मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत़. सोमवारी दिवसभरात ८ हजार १३ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०. ६४ टक्के इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ५ हजार ५५१ इतकी झाली असून, दिवसभरात ३८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ६३० इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २८१ इतकी आहे.
शहरात आजपर्यंत ११ लाख ६२ हजार ७९८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ४ हजार ६४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९४ हजार २२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला आहे. ==========================