पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यानंतर व शाळा सुरू होणार या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेली कोरोना चाचणीसाठीची गर्दी कमी झाल्याने, शहरातील चाचण्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवभरात केवळ २ हजार १३६ चाचण्या झाल्या असून, यामध्ये २०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
शहरात शनिवारपर्यंत १३ ते १४ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हची टक्केवारी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दहा टक्क्यांवर आली आहे. दरम्यान दिवाळी सणापूर्वी दहा पंधरा दिवस उसळलेली गर्दी, दिवाळी सणाचे दिवस व दिवाळी होऊन सात दिवस उलटले असले तरी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांच्या तपासणी व्यतिरिक्तच्या इतर नागरिकांच्या तपासणीचे प्रमाण फारसे वाढले नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याचे भाकित लागलीच करणे शक्य नाही. किंबहुना या लाटेची शहरात शक्यताही नसल्याचे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू होणार होत्या. यामुळे दिवाळीनंतर म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून अनेकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गर्दी केली होती. याचा परिणाम तपासणीचे प्रमाण वाढल्यावर दिसून आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पूर्वीप्रमाणेच ‘आयसीएमआर’ च्या निर्देषानुसाच ज्यांना लक्षणे आहेत, अशा नागरिकांचीच तपासणी करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा तपासणीची संख्या ही दोन हजारावर आली आहे. -----------सोमवारी १८१ जण कोरोनामुक्त पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभरात रविवारच्या तुलनेत तपासणीचे प्रमाण निम्म्याने कमी झाले असून, दिवसभरात २ हजार १९६ जणांनी कोरोना चाचणी केली़ यात २०६ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. आज १८१ जण कोरोनामुक्त झाले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे़ यात ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४२२ गंभीर कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १०४ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९२ हजार ५१८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.यापैकी १ लाख ६७ हजार १८८ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५७ हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत ४ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.शहरातील सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण संख्या ही ४ हजार ९१७ आहे.