पुणे : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुढील काही दिवस आरोग्य विविध समस्या जाणवत आहेत. त्याबाबत त्यांना योग्य मागर्दर्शन मिळावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविड कवच हे अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे कोरोनामुक्त झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपली समस्या मांडता येईल. त्यावर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून सल्ला दिला जाईल.
कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होणे, काही महिने श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुस, किडनीचे आजार, हृदयरोग अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने रुग्णालयांमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याचअनुषंगाने ‘कोविड कवच’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपसाठी वैद्यकीय शिक्षणचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे व उपअधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी पुढाकार घेतला. तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांनी अॅप विकसित करण्यात मदत केली आहे.कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना अॅपमधून आपली समस्या मांडता येईल. त्यानंतर त्यामध्ये निवडलेल्या एका शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ ‘एसएमएस’द्वारे मागर्दर्शन करतील. प्रत्येक रुग्णालयात एक तज्ज्ञ मदतीसाठी सज्ज असेल. तसेच अॅपमध्ये प्लाझ्मा दान आणि कोरोनाविषयी विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणारी माहिती असणार आहे.------------------कोरोनामुक्त व्यक्तींवर होणार संशोधन..कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींची सध्याची आरोग्य विषयक माहिती अॅपद्वारे भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुस, किडनी आजार, हृदयरोग यांसह विविध आजारांची तीव्रता वाढली किंवा कमी झाली, आरोग्यामध्ये आणखी काही समस्या उद्भवल्या याची माहिती घेतली जाईल. त्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. याद्वारे मिळालेली माहिती संकलित करून त्याचा अभ्यास केला जाईल. कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या समस्या शोधणे, त्यामुळे शक्य होणार आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.---------------------