पुणे : पालिकेचा कोरोनावरील एकूण खर्च अंदाजे ३०० कोटींच्या घरात गेलेला असून प्रत्यक्षात यातील ९२ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ६७७ एवढी झाली आहे. कोविड सेंटरची उभारणी, विलगीकरण कक्ष, रुग्णालय साहित्य, रुग्णवाहिका आदी ‘इंफ्रास्ट्रक्चर’ उभे करण्यासह रुग्णांवरील उपचार, औषधे आदींचा खर्च पाहता प्रत्येक रुग्णामागे १८ हजार ६७० रुपये खर्च झाला आहे.
चालू वर्षातील प्रत्यक्ष उत्पन्न, प्रत्यक्ष खर्च आणि शिल्लक याचा विचार करता पालिकेकडे सप्टेंबरपर्यंत अवघे १५० कोटीच शिल्लक होते. कोरोनाचा शहरात शिरकाव झाल्यापासून अगदी साध्या साध्या गोष्टींवरही पालिकेला खर्च करावा लागला आहे. साध्या मास्कपासून ते रुग्णालयातील उपचारांचा खर्च आणि कोविड केअर सेंटरपासून जम्बो रुग्णालयाच्या उभारणीपर्यंतचा खर्च पालिकेला करावा लागला आहे. कोरोनासंदर्भातील निविदा, औषधे, रुग्णालयांची बिले, मास्क-सॅनिटायझर-पीपीई कीट आदी साहित्यावरील खर्च, कोविड केअर सेंटरवरील खर्च, यासोबतच कर्मचा-यांचे वेतन, देखभाल-दुरुस्तीची कामे यावही दरमहा कोट्यवधींचा खर्च होत आहे.
कोविड सेंटरमधील गाद्यांपासून चादरी, बेडशीट, साबण, स्टेशनरी, स्वच्छता साहित्य आदींचाही या खर्चात समावेश आहे. पालिकेचा यावर खर्च झालेला असला तरी ‘सीएसआर’मधूनही पालिकेला मोठ्या प्रमाणावर मदत मिळालेली आहे. कोट्यवधी रुपयांचे साहित्य सामाजिक दायित्वामधून मिळाल्याने पालिकेचा खर्च काही प्रमाणात वाचला आहे.====पालिकेचे नवीन आर्थिक सुरु झाले आणि कोरोनाची साथ आली. केंद्र शासनाने टाळेबंदी लागू केल्यानंतर आर्थिक उत्पन्न घटले. मिळकत करामधून आतापर्यंत सर्वाधिक ९५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ऑक्टोबरमध्ये बांधकाम शुल्कामधून ५० कोटी आणि जीएसटीमधून १५० कोटी आणि अभय योजनेमधून १०० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. पालिकेला आतापर्यंत १९२० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.====विविध विकास कामे आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पालिकेकडून नेमल्या जाणाऱ्या ठेकेदारांनी भरलेल्या निविदांप्रमाणे त्यांना पैसे द्यावे लागतात. यावर्षी साधारणपणे १२०० कोटींची कामे दिली गेली होती. यातील जवळपास ६५० कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. यासोबतच खात्यांची कामे, पदपथ, पाणी पुरवठा, समान पाणी पुरवठा योजना आदी योजनांची कामे सुरु आहेत.====जम्बो रुग्णालयाच्या उभारणीसाठी पालिकेने सुरुवातीला १५ कोटी रुपये दिले. त्यानंतर दहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. स्थायी समितीने जम्बो रुग्णालयासाठी ७५ कोटी देण्यास मान्यता दिलेली आहे.====