बारामती : कोरोनावर प्रभावी गुणकारी ठरलेल्या प्लाझ्मा थेरपीचा बारामती शहरात प्रथमच वापर करण्यात आला आहे. या थेरपीद्वारे इंदापुर तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय नेत्याला जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी परिणामकारक ठरते.मात्र, बारामतीत रेमडेसिव्हिर इंजेक्शन आदी औषधांचा वापर करुन रुग्ण कोरोनामुक्त करण्यावर भर दिला जात होता. अद्याप या थेरपीचा वापर करण्यात आलेला नव्हता. प्रथमच ही थेरपी जीवदान देणारी ठरली आहे. शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात या थेरपीचा वापर केल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारल्याने सांगितले.संबंधित रुग्णाला १२ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ. राहुल मस्तुद, डॉ. महेश जगताप, डॉ. निर्मल वाघमारे, डॉ. समाधान चवरे, डॉ. रणजित मोहिते, डॉ. नरुटे यांनी या रुग्णावर उपचार सुरु केले.मात्र, सर्व उपचार करुन अपेक्षित सुधारणा न झाल्याने प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्याचा निर्णय डॉ. मस्तुद यांनी घेतला. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यातून काही तासात प्लाझमा ची सोय केली.शहरात प्रथमच ही थेरपीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. दरम्यान, शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा आलेख घसरल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.गेल्या २४ तासांत ३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकूण आरटीपीसीआर नमुने १८१ पैकी एकूण पॉझिटिव्ह- १७, खाजगी प्रयोग शाळेमार्फत तपासलेले एकूण आरटीपीसीआर - २८ त्यापैकी पॉझिटिव्ह -५कालचे एकूण अँटिजेन ८६, त्यापैकी पॉझिटिव्ह-१३ शहरात १८ तर ग्रामीणमध्ये २१ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.
बारामती रूग्णसंख्या- ३२८५ बरे झालेले रुग्ण - २५१३ कोरोनामुळे बळी - ८२