पुणे : पुणेकरांनो, आता काळजी घेण्याची वेळ आली आहे. एकाच दिवसात तेही मंगळवार दुपारपर्यंतच दिवसाभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या ६६१ वर पोहोचली आहे. यामध्ये आणखी भर पडण्याचीही शक्यता आहे.
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात काल ३२८ रुग्ण आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण मंगळवारी मात्र हा दिलासा तात्पुरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी दुपारपर्यंत महापालिकेला प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार दुपारपर्यंतच शहरात ६५० रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे शहरात मंगळवारी ४ हजार ६०६ जणांची तपासणी करण्यात आली.
याविषयी लोकमतशी बोलताना महापालिकेचा सहाय्यक आरोग्य प्रमुख डाॅ. संजीव वावरे म्हणाले ,” दुपारी ३ पर्यंत ६५० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत.”
पुणे शहरात रविवारी ६३४ वर गेलेला नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी निम्म्याच्या आसपास म्हणजेच ३२८ वर आली होती. हे शहरासाठी दिलासादायक चित्र असले तरी कोरोना संशयितांचे प्रमाण चार हजाराच्या पुढे गेले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत ११ लाख ०३ हजार ५४८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९८ हजार २९२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९० हजार ५६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी ७ जण पुण्याबाहेरील आहेत.