पुणे: पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयातील आयसीयू विभागातील खाटांची संख्या अपुरी पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. शहरात सध्या फक्त सहाच आयसीयू बेड्स उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे , पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात बेड्सची शहरातील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. आगामी गरज लक्षात घेत नियोजन करण्यात आले असून सीसीसी बेड्ससोबतच शहरात ऑक्सिजन बेड्स वाढवण्यासंदर्भात एक्शन प्लॅन तयार केला जात आहेत. या प्लॅन अंतर्गत सीसीसीमध्येही जवळपास १० टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत.
पुणे शहरातील बेड्स तातडीने वाढवण्यासंदर्भात महापौर मोहोळ, विभागीय आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यात सोमवारी (दि.५) बैठक झाली. यात शहरातील कोरोना रुग्णांकरता बेड्सची संख्या शीघ्रतेने वाढविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व त्यांची दखल घेऊन जलद गतीने कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, सीओईपीचे हॉस्टेल अथवा ॲग्रीकल्चर कॉलेज हॉस्टेल आणि उर्वरित कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करून त्या ठिकाणी १० % ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये देखील क्षमतेनुसार १०% ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. पालिकेच्या वापरात नसलेल्या इमारती जसे की, हॉस्पिटल, शाळा अथवा इतर इमारती, अशा ठिकाणी ऑक्सिजन बेडची उपलब्धता करता येईल का यासाठी माहिती अहवाल मागविण्यात आला आहे. लायगुडे व बोपोडी हॉस्पिटलमध्ये २० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात येणार असून तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. .....
आणखी २०० बेड्सची भर पडणार
महापालिकेच्या जम्बो हॉस्पिटलमध्ये येत्या दोन दिवसांत १०० बेड्स उपलब्ध केले जाणार असून तेथील उपलब्ध बेड्सची क्षमता ६०० पर्यंत वाढणार आहे. दळवी हॉस्पिटलमध्ये सध्या १०० बेड्स उपलब्ध असून येत्या दोन दिवसांत ही संख्या दुप्पट होणार असून आता तेथे २०० बेड्स उपलब्ध होतील.