पुणे : कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून, शहरातील ‘सुपर स्प्रेडर’ म्हणजेच ज्यांच्याकडून सर्वाधिक कोरोना संसर्गाचा धोका आहे अशा नागरिकांची कोरोना तपासणी (चाचणी) करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापासून ही तपासणी मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेतील जनसंपर्कात येणारे अधिकारी, कर्मचारी, शहरातील छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची व हॉटेल मालक व वेटर्स यांची प्राधान्याने तपासणी करण्यात येणार आहे.
याचबरोबर घरगुती सेवा पुरविणारे म्हणजे दुध पुरविणारे, घरकाम करणाऱ्या मोलकरीण व इतर नोकर, गॅस सिलेंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रॉनिक विषयक, नळजोड व तत्सम कामे करणाऱ्या व्यक्ती, इस्त्रीवाले व पुरोहित यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाचा अधिक धोका ज्यांच्याकडून आहे,अशा वाहतुक व्यवसायातील पीएमपीएमएलचे कर्मचारी, मालवाहतुक करणारे ट्रक चालक, रिक्षाचालक यांच्यासह मजूर, हमाल, बांधकाम मजूर यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.तसेच पोलिस, होमगार्ड, सिक्युरिटी गार्ड व आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचीही या मोहिमेत तपासणी होणार आहे.
ज्या व्यक्ती सातत्याने इतर नागरिकांच्या संपर्कात असतात व ज्यांच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. अशा नागरिकांना कोरोना तपासणी करून इतरांपासून विलग करणे व संसर्ग टाळणे हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे. दरम्यान या तपासणीच्या नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, याकरिता आवश्यक कर्मचारी वर्ग, तपासणी किट याचीही तयारी झाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
---------------------------